मुंबई – प्रवाशाला एखाद्या ठिकाणी घेऊन जाण्यास नकार देण्यासह अन्य मनमानी कारभार करणार्या टॅक्सी चालकांविरोधात तक्रार करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (‘आर्.टी.ओ.’ ने)साहाय्यता केंद्र चालू केले आहे. यासाठी ताडदेव आर्.टी.ओ.ने ९०७६२०१०१० हा साहाय्यता क्रमांक उपलब्ध केला आहे. या क्रमांकावर तक्रार केल्यास त्याची त्वरित नोंद घेऊन दोषी चालकाचा वाहन परवाना किंवा अनुज्ञप्ती (लायसन्स) रहित करण्यात येणार आहे. ही सेवा १ सप्टेंबरपासून चालू करण्यात येणार आहे. काळी-पिवळी टॅक्सी, मोबाईल ॲप आधारित टॅक्सी यांच्या संदर्भातील तक्रारी या क्रमांकावर करता येणार आहेत. प्रवाशांना सकाळी ७ ते सायंकाळी ७ या कालावधीत संपर्क साधून किंवा व्हॉट्सअपवर संदेश पाठवून, तसेच केवळ लघुसंदेश पाठवूनही पुराव्यासह तक्रार करता येणार आहे.
प्रवाशांना रात्री प्रवासादरम्यान समस्या भेडसावल्यास [email protected] या ई-मेलवरही पुराव्यासह तक्रार नोंद करता येईल.
अपघात झाल्यानंतर सेवाभावी वृत्तीने अपघातग्रस्तांना साहाय्य करणार्या टॅक्सीचालकांना प्रोत्साहन देण्यासाठी ताडदेव आर्.टी.ओ.ने ‘जीवनदूत सत्कार योजना’ चालू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेनुसार अशा टॅक्सीचालकांचा गौरव करण्यात येणार आहे. |