महाराष्ट्र राज्य शैक्षणिक आणि आध्यात्मिक क्षेत्रांतही अग्रेसर व्हावे ! – भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल, महाराष्ट्र  

भगतसिंह कोश्यारी

 

कणकवली – महाराष्ट्र राज्य केवळ आर्थिक राजधानी न रहाता आध्यात्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रांतही प्रगती करून जगात अग्रेसर असले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल तथा महाराष्ट्र राज्य विद्यापिठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी २७ ऑगस्ट या दिवशी तळेरे येथे केले.
वैभववाडी तालुक्यातील तळेरे येथील मुंबई विद्यापिठाच्या विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी उपकेंद्राचे उद्घाटन आणि वेंगुर्ला येथील सागरी अभ्यास प्रकर्ष केंद्राचे भूमीपूजन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. या दौर्‍यात शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, भाजपचे आमदार नितेश राणे, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्यासह अधिकारी अन् राजकीय पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यपाल पुढे म्हणाले, ‘‘देशात नावाजलेले मुंबई विद्यापीठ जगातील अमेरिका आणि ब्रिटन यांसारख्या देशांमधील दर्जेदार विद्यापिठांप्रमाणे विश्वविद्यापीठ व्हावे, असा प्रयत्न आहे. राज्य शैक्षणिकदृष्ट्या अग्रेसर रहावे, यासाठी कोकणातील सुंदर प्रदेशात मुंबई विद्यापिठाचे नवे उपकेंद्र चालू करून या प्रदेशाचा शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी प्रयत्नांना प्रारंभ झाला आहे.’’