मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ८० टक्के अपघात मानवी चुकांमुळे !

मुंबई – मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर जवळपास ८० टक्के अपघात हे मानवी चुकांमुळे झाले आहेत, तसेच या महामार्गावर सर्वाधिक मृत्यू वेगमर्यादेचे उल्लंघन केल्यामुळे झाले आहेत, अशी माहिती शासकीय अहवालातून समोर आली आहे.

१. १ जानेवारी ते ऑगस्ट २०१९ या कालावधीत वेगमर्यादेचे उल्लंघन केल्यामुळे अनुमाने २.९ लाख गुन्हे नोंद करण्यात आले आहेत, तर ‘सीट बेल्ट’ न लावता वाहन चालवल्याविषयी १६ सहस्र ९१८ जणांच्या विरोधात गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

२. द्रुतगती महामार्गावर अनधिकृत वाहनतळांची प्रकरणे समोर आली आहेत. यातूनच अपघात झाले आहेत.

३. घाट विभागात प्रति घंटा ५० कि.मी. आणि महामार्गावरील इतर भागांत कारसाठी प्रति घंटा १०० कि.मी. वेगमर्यादा अनेक वाहनचालकांनी धुडकावून लावली होती. हे सर्व सीसीटीव्हीत चित्रीत झाले आहे.

४. मागील दीड वर्षात महामार्गावर झालेल्या अपघातात १३१ जणांचा मृत्यू झाला आहे. जानेवारी-जुलै २०२१ मध्ये द्रुतगती महामार्गावर ५७ मृत्यू झाले होते, तर वर्ष २०२२ मध्ये ही आकडेवारी ४३ पर्यंत खाली आली.

अपघात होण्यामागील कारणे !

द्रुतगती मार्गावरील ८० टक्के अपघात हे मानवी चुकांमुळे झाले आहेत. २० टक्के अपघात हे वाहनांतील तांत्रिक बिघाड आणि अन्य कारणे यांमुळे झाल्याची नोंद आहे. मानवी चुकांमुळे अपघात होण्याची मुख्य कारणे म्हणजे द्रुतगती मार्गावर वाहतूक नियम न पाळणे, आसनावर बसल्यावर लावावयाचा पट्टा (सीटबेल्ट) न वापरणे, वाहने अतीवेगाने चालवून पुढील वाहनांना धडकणे, वाहनांवरील नियंत्रण सुटणे, वाहन उलटणे, अवजड वाहने जलद मार्गिकेमधून (फास्ट लेन) जाणे इत्यादी कारणांमुळे गंभीर अपघात झाले आहेत.

संपादकीय भूमिका 

मानवी चुकांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी जनतेला शिस्त लावणे आवश्यक !