गणेशोत्सव विसर्जन व्यवस्थेसंदर्भात वसई-विरार महापालिका आयुक्तांना शिवसेना युवासेनेच्या वतीने निवेदन !

गणेशमूर्तींचे तलावांमध्ये विसर्जन करण्यास अनुमती देण्याची मागणी

वसई (पालघर) – वसई-विरार शहर महानगरपालिकेकडून येत्या गणेशोत्सवाच्या संदर्भात घेण्यात आलेल्या निर्णयांचा पुनर्विचार करावा, अन्यथा पूर्वीप्रमाणे तलावांमध्ये विसर्जन करण्यास अनुमती द्यावी, या मागणीसाठी २६ ऑगस्ट २०२२ या दिवशी महानगरपालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांची भेट घेऊन याविषयीचे निवेदन देण्यात आले.

वसई शहरात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. पूर्वी परिसरातील तलावांमध्ये विसर्जन केले जात होते. आता महानगरपालिकेच्या आदेशानुसार ४ फुटांपर्यंतच्या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करायचे आहे; मात्र त्यांची संख्या न्यून असून या प्रकारांत मूर्तींचे पावित्र्य भंग होते. तसेच समुद्रात विसर्जन करण्यासाठी तेथील किनारपट्टी भौगोलिकदृष्ट्या अनुकूल नसून रस्ते सोयीचे नाहीत. महानगरपालिकेकडून त्यासाठी अद्याप व्यवस्था करण्यात आलेली नाही; म्हणून कृत्रिम तलावांची संख्या वाढवून मूर्तींचे पावित्र्य राखले जावे, समुद्रात विसर्जन व्यवस्थेत सुधारणा करावी, अन्यथा स्थानिक तलावात विसर्जन करण्याची अनुमती द्यावी, यासाठी आयुक्तांशी चर्चा करून निवेदन देण्यात आले. या वेळी शिवसेनेचे नालासोपारा संयुक्त नगर शाखाप्रमुख सर्वश्री जितेंद्र हजारे, शिवसेना तालुकाप्रमुख स्वप्नील बांदेकर, युवा सेना जिल्हा सचिव भूमिष सावे, शहरप्रमुख प्रदीप सावंत, विधानसभा अधिकारी रोहन चव्हाण, शहर सचिव नितेश कुवेसकर, उपशहर अधिकारी राजेंद्र राऊळ हे उपस्थित होते.