‘मंकीपॉक्स’चा संसर्ग : लक्षणे आणि घ्यावयाची काळजी

फेब्रुवारी मासात ‘मायक्रोसॉफ्ट’ या आंतरराष्ट्रीय संगणकीय आस्थापनाचे संस्थापक बिल गेट्स यांनी ‘सी.एन्.बी.सी.’ या वृत्तवाहिनीशी बोलतांना ‘नवीन महामारी लवकरच येईल आणि तिचा विषाणू कोरोनाशी संबंधित नसेल’, असे भाकीत वर्तवले होते. ते आता शब्दश: खरे होतांना दिसत आहे. मागील २ वर्षे कोरोना संसर्गामुळे जग होरपळून निघाले. आता जगभरात पुन्हा एकदा आणीबाणीचा प्रसंग ओढावेल, अशी स्थिती निर्माण होतांना दिसत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ‘मंकीपॉक्स’ या रोगाचा संसर्ग होण्याची शक्यता व्यक्त करत जगासाठी आणीबाणी घोषित केली आहे. आजवर मंकीपॉक्सचा संसर्ग अनुमाने ८० देशांत झाला असून ४७ सहस्रांहून अधिक रुग्ण यामुळे बाधित झाले आहेत. हा रोग अत्यंत वेगाने पसरत असल्याने जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. स्पेन, जर्मनी, फ्रान्स, नेदरलँड्स, पोर्तुगाल, बेल्जियम, अमेरिका, कॅनडा या देशांमध्ये या रोगाचा संसर्ग वाढत असून यामुळे १३ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

भारतातही या रोगाचे पहिले ३ रुग्ण केरळ, तर १ रुग्ण देहलीत, असे एकूण ४ रुग्ण आढळले आहेत. पुण्यातील पाषाण येथे असलेल्या ‘राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थे’मध्ये या संदर्भात अधिक संशोधन चालू आहे. या संस्थेतील डॉ. प्रज्ञा यादव आणि डॉ. रीमा सहाय यांची नावे संस्थेने देशातील अन्य वैद्यक यंत्रणांसाठी तज्ञ संपर्क व्यक्ती म्हणून घोषित केली आहेत.


‘मंकीपॉक्स’ मुळे शरिरावर फोडांसारखे दिसणारे पुरळ

१. ‘मंकीपॉक्स’ हा विषाणूजन्य जुनाच आजार !

मंकीपॉक्स हा विषाणूजन्य रोग आहे. हा विषाणू गोवर, कांजिण्या यांसारख्या रोगांच्या विषाणूंशी साम्य असलेला ‘ऑर्थोपॉक्स’ घटकातील विषाणू आहे. हा काही नवा रोग नाही. याचा पहिला संसर्ग वर्ष १९५८ मध्ये वैद्यकीय चाचण्यांसाठी पाळलेल्या काही माकडांमध्ये आढळून आला होता. त्यानंतर पहिला मानवी रुग्ण वर्ष १९७० मध्ये ‘काँगो प्रजासत्ताक’ या देशात आढळला होता. याचा उद्भव प्रामुख्याने आफ्रिकन उपखंडात झाल्याचे दिसून येते. यानंतर युरोपीय देश वेगाने या संसर्गाच्या कचाट्यात सापडत आहेत. ‘आजवर या रोगामुळे थोडे का होईना; परंतु मृत्यू झाल्यामुळे त्यापासून मानवाला धोका आहे’, असे जागतिक आरोग्य संघटनेला वाटत आहे. या रोगामुळे होणारा मानवी मृत्यूदर अनुमाने १० टक्के असल्याचे आरोग्यविषयक तज्ञांचे म्हणणे आहे. यामुळेच जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख संचालक डॉ. टेड्रोस गेब्रेयसस यांनी या रोगाविषयी विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

२. रोगाची लक्षणे आणि घ्यावयाची काळजी

अ. ‘डोकेदुखी, ताप, ग्रंथींना सूज, स्नायूदुखी, स्रावाने भरलेले फोड, पाठदुखी, कंबरदुखी आणि शरिराला कंप सुटणे, अशी सध्यातरी या रोगाची लक्षणे दिसून येत आहेत. ही लक्षणे अनुमाने २ ते ४ आठवडे दिसून येतात’, असे वैद्यकीय तज्ञांचे म्हणणे आहे.

आ. आपल्या देशातील आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीप्रमाणे या आजाराचा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये ताप येणे, लसिका ग्रंथींना (कानामागे, काख, जांघ येथील लसिका ग्रंथींना) सूज येणे, डोकेदुखी, अंगदुखी, थंडी वाजणे, घाम येणे, घसा खवखवणे आणि खोकला या प्रकारची लक्षणे आढळून येतात. कुपोषण, कृमी संसर्ग अणि प्रतिकारशक्ती न्यून असलेल्या व्यक्तीमध्ये मंकीपॉक्स गंभीर स्वरूप धारण करू शकतो. डोळ्यात वेदना होणे अथवा दृष्टी अधू होणे, श्वास घ्यायला त्रास होणे किंवा छातीत दुखणे, शुद्ध हरपणे, झटके येणे, लघवीचे प्रमाण न्यून होणे, तोंडावाटे अन्नपाणी न जाणे, प्रचंड थकवा जाणवणे, अशी लक्षणे आढळल्यास तात्काळ वैद्यकीय तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

इ. या आजारामुळे न्यूमोनिया, मेंदूचे आजार, दृष्टीपटलाचा संसर्ग (यामध्ये अंधत्व येण्याची शक्यता नाकारता येत नाही.) आदी आजार होऊ शकतात.

ई. या आजाराचा उद्भवन कालावधी (इनक्युबेशन पिरियड) ६ ते १३ दिवस असला, तरी हा कालावधी ५ ते २१ दिवसांपर्यंत असू शकतो. अशा रुग्णांपासून इतरांना संसर्ग होण्याचा धोका असतो. ‘स्मॉलपॉक्स’ या रोगावर अस्तित्वात असलेली लस मंकीपॉक्सवर ८५ टक्के परिणामकारक असल्याची माहिती आरोग्यविषयक संस्थांनी दिली आहे.

उ. प्रयोगशाळेत ‘पी.सी.आर्.’ चाचणीद्वारे या आजाराचे निदान केले जाते. मंकीपॉक्सचा प्रसार रोखण्यासाठी निदान झालेल्या रुग्णाचे कपडे अथवा अंथरूण-पांघरूण यांच्याशी संपर्क येऊ न देणे, हातांची स्वच्छता ठेवणे, मंकीपॉक्स रुग्णांवर उपचार करतांना ‘पीपीई किट’चा वापर करणे, अशा सूचना आरोग्य यंत्रणेने दिल्या आहेत.

ऊ. या रोगाचा एखादा रुग्णही साथ निर्माण होण्यास कारणीभूत ठरण्याची शक्यता आरोग्य यंत्रणेस वाटत आहे. त्यामुळे प्रत्येक बाधित रुग्णाच्या जवळच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी करण्यात येणार आहे. संशयित रुग्णांना विलगीकरणात ठेवून उपचार करण्यात येणार आहेत. जोपर्यंत रुग्णाच्या कातडीवरील पुरळ, फोड पूर्णपणे बरे होत नाहीत आणि त्यावरील खपल्या गळून जात नाहीत, तोपर्यंत त्याला विलगीकरणात ठेवावे. आपल्या भागात एखादी मंकीपॉक्ससदृश्य लक्षणे असलेली व्यक्ती आढळल्यास तिचे तात्काळ विलगीकरण करावे, तसेच जवळच्या आरोग्य केंद्रात भरती करावे, अशी सूचनाही आरोग्य यंत्रणेने केली आहे.

ए. रुग्णाने त्रिस्तरीय मुखपट्टीचा (ट्रिपल लेयर मास्क) वापर करावा. रुग्णाने पुरेसे पाणी, सकस अन्न आणि द्रव पदार्थ घ्यावेत.

३. काळजी घेणे आपल्या हाती !

भारतासारख्या लोकसंख्येच्या दृष्टीने जगात दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या देशात मंकीपॉक्सचे रुग्ण आढळणे, हे चिंता करायला लावणारे आहे. या रोगाच्या लाटेचा सामना करण्यासाठी देशात काही निर्बंध लादले गेले, तर देशाला नव्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे या रोगाच्या संकटाचा एकजुटीने आणि शिस्तबद्धरित्या सामना करणे एवढेच आपल्या हाती आहे. त्यामुळे नागरिकांनी दायित्वशून्यपणे न वागता या रोगापासून स्वतःचा बचाव होण्यासाठी काळजी घ्यावी.

– श्री. विजय भोसले, ज्येष्ठ पत्रकार, मुंबई. (साभार : vijaybhosale53.blogspot.com)