मनसेच्या मराठी अस्मितेला हिंदुत्वाची जोड देणारे ‘मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक’ हे मनसेचे नवे घोषवाक्य !

मनसेच्या सदस्य नोंदणी अभियानाला पुणे येथून प्रारंभ

पुणे – नेहमी फक्त मराठीवर लक्ष केंद्रित करणारे राज ठाकरे यांनी यंदा हिंदुत्वाचे सूत्र मनसेच्या घोषवाक्यात समाविष्ट केले आहे. आता ‘भारत नाही, हिंदूंचा हिंदुस्थान’, असे नमूद केलेले राज ठाकरेंचे नवे फलक पुढे आले आहेत. यावर राज ठाकरेंचा ‘हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी हिंदुजननायक’, असा उल्लेख करण्यात आला आहे, तर मनसेच्या मराठी अस्मितेला हिंदुत्वाची जोड देणारे ‘मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक’, हे मनसेचे नवे घोषवाक्य देण्यात आले आहे.

मनसेच्या सभासद नोंदणीला २५ ऑगस्टपासून पुणे येथून प्रारंभ झाला, त्यासाठी राज ठाकरे पुण्याच्या दौर्‍यावर आले होते. या वेळी राज ठाकरे यांनीच त्यांच्या नावाची पहिली नोंदणी केली. या वेळी मोठ्या प्रमाणात मनसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते. मनसेच्या सभासद नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळत आहे.