‘सनातनच्या साधकाचे प्रवचन ऐकून श्रीमती उषा बडगुजर (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ६२ वर्षे) आणि त्यांच्या कुटुंबियांनी सेवा अन् साधना करण्यास प्रारंभ केला. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रथमदर्शनी पाहिल्यावर साक्षात् ईश्वरभेटीचा आनंद उषा बडगुजर यांनी अनुभवला. त्यांच्या घरातच सेवाकेंद्र असल्यामुळे घरातील सात्त्विकतेतही वाढ झाली. त्या आयुष्यातील अनेक कठीण प्रसंगांना गुरुकृपेने सामोर्या गेल्या आणि स्थिर राहिल्या. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी उषा बडगुजर यांना पाठवलेल्या प्रसादातून त्यांना चैतन्य मिळाले आणि त्या चैतन्यामुळे उषा बडगुजर यांना कविता सुचण्यास प्रारंभ झाला. त्यांच्यातील भावामुळे त्यांना सुचलेल्या कविता त्या गुरुचरणी अर्पण करतात. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सूक्ष्मातून सांभाळले आणि कठीण प्रसंगांत स्थिर ठेवले’, याबद्दल कृतज्ञताभावात असणार्या श्रीमती उषा बडगुजर यांचा साधनाप्रवास आपण पाहूया.
१. साधिका आणि तिचे कुटुंबीय यांनी साधनेला आरंभ करणे
१ अ. सनातन संस्थेच्या साधकाचे प्रवचन ऐकून यजमानांना प्रवचन आवडणे : ‘आम्ही वर्ष १९९९ मध्ये घरी श्री गणेशमूर्तीची स्थापना केली. त्याच दिवशी सनातन संस्थेचे साधक आमच्या घरी आले होते. त्यांनी आम्हाला सनातन संस्थेचे कार्य समजावून सांगितले आणि रात्री दत्तमंदिरात प्रवचन असल्याचे सांगितले. आम्ही चौघेजण (मी, माझे पती (रवींद्र) आणि आमची दोन मुले (मोठा मुलगा श्री. उदय आणि दुसरा मुलगा श्री. रोहन) प्रवचनाला गेलो. यजमानांना प्रवचन आवडले. तेव्हापासून आमच्या साधनेला प्रारंभ झाला. मी सत्संगाला जात असे. मी साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करणे, साधकांसाठी महाप्रसाद बनवून देणे आणि अन्य प्रासंगिक सेवा करत असे. यजमानांना पाक्षिक आणि साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ यांचे हिशोब ठेवणे, ग्रंथप्रदर्शन सेवेचे नियोजन करणे अन् दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करणे, अशा विविध प्रकारच्या सेवा करण्याची संधी मिळाली. आमचा मोठा मुलगा उदय दहावीत असल्यापासून सेवा करू लागला. तो ग्रंथप्रदर्शनाची सेवा करत होता. दुसरा मुलगा रोहन याने बारावीनंतर साधनेला आरंभ केला.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन झाल्यावर ‘साक्षात् ईश्वर भेटला’, असे वाटून आनंद होणे
एकदा जळगाव येथे प.पू. गुरुमाऊली (परात्पर गुरु डॉ. आठवले) यांचे मार्गदर्शन होते. त्यांचे दर्शन झाल्यावर ‘साक्षात् ईश्वर भेटला’, असे वाटून मला आनंद झाला आणि माझ्याकडून पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली.
३. गुरुकृपेमुळे घरातच सेवाकेंद्र चालू होणे
माझ्या वडिलांनी (श्री. माधवराव कौतिक बडगुजर (वय ९३ वर्षे) यांनी) मला एक खोली दिली होती. त्या खोलीतच सेवाकेंद्र चालू झाले. त्या वेळी ‘श्री दुर्गादेव्यै नमः ।’ हा सामूहिक नामजप करण्यासाठी साधक घरी येऊ लागले. त्यामुळे घरात प्रसन्न वाटून घरातील सात्त्विकतेतही वाढ झाली.
४. यजमानांना अर्धांगवायूचा झटका आला असतांना त्यांच्या डोक्यावर हात ठेवून गणपतीचा नामजप केल्यावर गुरुदेवांच्या कृपेने यजमान चालू शकणे
वर्ष २००४ मध्ये यजमानांना अर्धांगवायूचा झटका आला. त्यांना चालता येत नव्हते, तरीही माझे मन स्थिर होते. त्या वेळी साधकांनी विचारून घेऊन आम्हाला नामजपादी उपाय सांगितले. मी यजमानांच्या डोक्यावर हात ठेवून गणपतीचा नामजप केला. तेव्हा गुरुदेवांच्या कृपेने यजमानांना चालता येऊ लागले. त्या वेळी माझी भावजागृती होऊन गुरुमाऊलींच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.
५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने रामनाथी आश्रमात जाण्याची संधी मिळणे आणि ‘त्यांचा सत्संग अन् त्यांनी दिलेला प्रसाद’ यांतील चैतन्यामुळे कविता सुचण्यास प्रारंभ होणे
जळगाव येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा असतांना गुरुकृपेने मला सेवेची संधी मिळाली. या सभेनंतर आम्हाला (मला आणि यजमानांना) परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने रामनाथी आश्रमात जाण्याची संधी मिळाली. तेथे आम्हाला गुरुकृपेने ५ दिवस चैतन्य ग्रहण करायला मिळाले. आमच्यावरील ही मोठी ईश्वरी कृपा होती. त्या वेळी आम्हाला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगाचा लाभ झाला. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मला प्रसाद दिला. तेव्हा मला पुष्कळ आनंद झाला आणि चैतन्य ग्रहण करता आले. त्या वेळी मला कविता सुचली आणि लिहिता आली. तेव्हापासून गुरुदेवांच्या कृपेने मला कविता सुचतात आणि त्या गुरुचरणी अर्पण होत आहेत.
६. गुरुकृपेने वर्ष २०१० मध्ये आम्हाला चांगल्या ठिकाणी सेवाकेंद्राजवळ वास्तू मिळाली. ‘ही वास्तू म्हणजे गुरुदेवांनी दिलेला लहानसा आश्रमच आहे’, असा भाव माझ्या मनात सतत असतो.
७. यजमानांचे निधन झाल्यांतर स्थिर राहू शकणे
१९.९.२०१५ या दिवशी माझ्या यजमानांचे निधन झाले. त्या वेळीही गुरुमाऊलींनी आमच्या कुटुंबाला स्थिर ठेवले. हीच मोठी कृपा आहे.
८. ‘स्वप्नात ‘प.पू. भक्तराज महाराज आणि त्यांचे शिष्य (परात्पर गुरु) डॉ. आठवले घरी येऊन एकमेकांशी बोलत आहेत’, असे दिसणे अन् ‘त्यांच्या दर्शनाने चैतन्यात न्हाऊन निघाले’, असे जाणवणे
आम्ही धुळे येथे रहात असतांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले धुळे येथे येणार आहेत’, असे आम्हाला समजले. ‘त्यांना घरी बोलवावे’, असे आम्हाला वाटून आम्ही घरातील स्वच्छता केली. त्याच दिवशी मला स्वप्नात दिसले, ‘प.पू. भक्तराज महाराज आणि त्यांचे शिष्य (परात्पर गुरु) डॉ. आठवले पलंगावर बसले आहेत. ते एकमेकांशी बोलत आहेत.’ त्यांच्या दर्शनाने मला चैतन्य मिळून ‘त्या चैतन्यात न्हाऊन निघाले’, असे मला जाणवले.
९. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी व्यक्त केलेली कृतज्ञता !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच आम्ही साधनेत आलो. आम्ही सनातन संस्थेमध्ये आलो नसतो, तर आम्हाला मानसिक त्रास होऊन कष्टमय जीवन जगावे लागले असते. त्यांच्या कृपेमुळेच आम्हाला स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया शिकायला मिळाली. ‘आनंदी जीवन कसे जगावे ?’, हे मला शिकायला मिळाले. गुरुदेवांनी अनेक प्रसंगांमध्ये आम्हाला फुलाप्रमाणे सांभाळले. सर्व संत आणि साधक यांच्याकडून मला प्रीती अनुभवता आली. अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी आणि सनातन संस्थेप्रती कोटीशः कृतज्ञता !’
– श्रीमती उषा रवींद्र बडगुजर (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ६२ वर्षे), जळगाव (२१.४.२०२२)
|