पिंपरी (पुणे) येथील शाळा व्यवस्थापनांच्या हलगर्जीपणामुळे सहस्रो विद्यार्थी लाभांपासून वंचित !

प्रतिकात्मक छायाचित्र

पिंपरी (पुणे) – शासनाकडून दिल्या जाणार्‍या सर्व योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळावा, त्यासाठी मुलांचे आधार कार्ड ‘लिंक करणे’ (संगणक प्रणालीमध्ये अद्ययावत् नोंद करणे) याकडे महापालिका शाळा, तसेच सर्वच खासगी शिक्षण संस्थांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना लाभांपासून वंचित रहावे लागत आहे. त्याविषयी शिक्षण विभागाने वारंवार सूचना देऊनही याविषयीची माहिती ‘सरल स्टुडंट पोर्टल’ या संगणक प्रणालीमध्ये नोंद करण्यात हलगर्जीपणा होत आहे.

विद्यार्थी आधारकार्ड अभावी योजनांच्या लाभांपासून वंचित रहाण्याची शक्यता असल्याचे शिक्षण विभागातील अधिकार्‍यांचे म्हणणे आहे; परंतु असे असूनही महापालिका, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्व:व्ययाने माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधून सहस्रो विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अद्यापही नोंद केलेले नाही. यासाठी या शाळांना ३० ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर विद्यार्थी लाभापासून वंचित राहिल्यास त्याचे दायित्व शाळा व्यवस्थापनावर असेल, असे शिक्षक विभागाकडून सांगण्यात येत आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे म्हणाल्या, ‘‘विद्यार्थ्यांचे आधारकार्ड नोंद करण्यात शाळांचा हलगर्जीपणा आणि विद्यार्थीप्रति गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. अशा शाळांमुळे जर विद्यार्थी योजनांपासून वंचित राहिले, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.’’

संपादकीय भूमिका

शासनाने केवळ विद्यार्थ्यांसाठी योजना देऊन न थांबता त्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोचतात का ? याकडेही लक्ष द्यावे.