हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ (वय ५५ वर्षे) सद्गुरुपदी विराजमान झाल्याच्या सोहळ्याचे श्री. राम होनप यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

‘२९.६.२०२२ या दिवशी हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ (वय ५५ वर्षे) सद्गुरुपदी विराजमान झाले. रामनाथी (गोवा) येथे झालेल्या या कार्यक्रमाचे देवाने माझ्याकडून करवून घेतलेले सूक्ष्म परीक्षण पुढे दिले आहे.

सद्गुरु नीलेश सिंगबाळ

१. सद्गुरुपद प्राप्त होण्यापूर्वी

श्री. राम होनप

सत्संगात पू. नीलेश सिंगबाळ यांनी वाराणसी आश्रमात असतांना त्यांना आलेल्या विविध अनुभूती सांगितल्या. त्या वेळी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत. हे सूक्ष्म परीक्षण पू. सिंगबाळ ‘सद्गुरु’ घोषित करण्यापूर्वीचे असल्याने त्यांचा उल्लेख ‘पूजनीय’, असा केला आहे.

अ. पू. नीलेश सिंगबाळ बोलतांना पाताळातील एक वाईट शक्ती सूक्ष्मातून एका अन्य वाईट शक्तीला पू. सिंगबाळ यांना उद्देशून म्हणाली, ‘आज आणखी एक ‘सद्गुरु’ झाले आहेत.’ यावरून त्या वाईट शक्तीला ‘पू. सिंगबाळ सद्गुरुपदी विराजमान झाले आहेत’, हे पूर्वीच समजले होते’, हे माझ्या लक्षात आले.

आ. पू. नीलेश सिंगबाळ आणि त्यांच्या बाजूला बसलेल्या श्रीसत्‌शक्ति सौ. बिंदा नीलेश सिंगबाळ हे एकमेकांशी सूक्ष्मातून पांढर्‍या चैतन्य लहरींनी जोडलेले दिसले. यांतून ‘दोघे एकमेकांशी चैतन्याने जोडलेले आहेत’, असे मला जाणवले.

इ. पू. सिंगबाळ बोलतांना त्यांच्या वाणीतून पुष्कळ चैतन्य वातावरणात प्रक्षेपित होत होते, तसेच त्या वेळी सत्संगात अनेक संत आणि सद्गुरु उपस्थित होते. त्यामुळे तेथे वाईट शक्तींना काही कार्य करता येत नव्हते. परिणामी सत्संगापासून दूर अंतरावर उपस्थित असलेल्या वाईट शक्तींपैकी काही वाईट शक्ती एकमेकांना उद्देशून ‘आपण नंतर येऊ’, असे म्हणत निघून गेल्या आहेत, असे मला दृश्य दिसले.

ई. पू. सिंगबाळ एक अनुभूती सांगतांना म्हणाले, ‘वाराणसी आश्रमाजवळ आंब्याचे एक झाड आहे. पूर्वी जोराने वारा आला की, आंबे झाडावरून खाली पडायचे; परंतु यंदा असे घडले नाही.’ हे वाक्य ऐकून वाईट शक्ती सूक्ष्मातून रागाने म्हणाली, ‘पुढच्या वर्षी आम्ही तिकडे आंबे पाडायला येऊ.’

उ. सत्संगाच्या मध्यभागी एक तेजस्वी पांढरा गोल आकार दिसत होता. त्या वेळी ‘ते एक महात्मा असून सत्संग ऐकण्यासाठी सूक्ष्मातून उपस्थित आहेत’, असे मला जाणवले.

ऊ. पू. सिंगबाळ बोलतांना त्यांच्या वाणीतून प्रक्षेपित होत असलेले चैतन्य चौथ्या पाताळापर्यंत पोचत होते. तेथे अकस्मात् काच फुटल्याप्रमाणे आवाज ऐकू येतो, त्याप्रमाणे सूक्ष्मातून मला आवाज ऐकू आला. त्या वेळी ‘पू. सिंगबाळ यांच्याकडून प्रक्षेपित होत असलेल्या चैतन्याने तेथील वाईट शक्तींची काळी शक्ती काही प्रमाणात नष्ट झाल्याचा हा परिणाम आहे’, असे मला जाणवले.

२. सद्गुरुपद प्राप्त झाल्यानंतर

अ.  पू. सिंगबाळ यांना सद्गुरुपद प्राप्त झाल्यानंतर सूक्ष्मातून एका देवीने त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली आहे, असे दृश्य मला दिसले.

आ. सद्गुरु सिंगबाळ बोलतांना त्यांच्या मुखातून निळ्या दैवी लहरींचे वातावरणात प्रक्षेपण होऊ लागले.

इ. सद्गुरु सिंगबाळ यांच्या पाठीमागे सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉ. आठवले श्रीविष्णूच्या रूपात उभे आहेत, असे दृश्य मला दिसले.

ई. पू. सिंगबाळ यांना सद्गुरुपद प्राप्त झाल्याच्या घटनेच्या वेळी पाताळातील वाईट शक्तींना पुष्कळ राग आला. तो त्यांनी  पाताळात जोराने वाद्ये वाजवून व्यक्त केला.

उ. सद्गुरु सिंगबाळ यांच्या सन्मानाच्या वेळी पांढरा पोशाख नेसलेली एक दैवी स्त्री सूक्ष्मातून आनंदाने नृत्य करत आहे, असे मला दृश्य दिसले.

ऊ. सद्गुरु सिंगबाळ बोलतांना अकस्मात् दिवे गेले. त्या वेळी सूक्ष्मातील वाईट शक्तींना ‘कशी फजिती झाली’, या विचाराने हसू आले.

ए. सद्गुरु सिंगबाळ यांच्या शरिरात सूक्ष्मातून दैवी गुलाबी रंग दिसत होता. ‘त्यांच्यात साधकांप्रती असलेल्या प्रेमामुळे तो निर्माण झाला आहे’, असे मला जाणवले.

ऐ. पू. सिंगबाळ यांना सद्गुरुपद प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या वाणीतून पूर्वीच्या तुलनेत अधिक प्रमाणात चैतन्याचे प्रक्षेपण वातावरणात होत आहे, असे मला जाणवले.’

– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.७.२०२२)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक