‘२०.६.२०२२ या दिवशी गोव्यातील रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील एका संतांचा कान पुष्कळ दुखत होता. मला त्यांच्यासाठी नामजपादी उपाय करायला सांगण्यात आले. मी उपाय शोधले असता मला ‘एका हाताचा तळवा सहस्रारवर आणि दुसर्या हाताचा तळवा विशुद्धचक्रावर ठेवून ‘महाशून्य’ हा नामजप करणे’, हा उपाय मिळाला. मी १ घंटा हा नामजप केल्यावर संतांच्या त्या दोन्ही चक्रांवरील त्रास न्यून झाल्याचे मला जाणवले. मी त्या संतांसाठी पुन्हा उपाय शोधले असता मला ‘तर्जनीच्या टोकाला अंगठ्याचे टोक लावणे’, ही मुद्रा आणि ‘श्री हनुमते नमः ।’ हा नामजप मिळाला, तसेच त्या मुद्रेने न्यास करण्याचे एक स्थान सहस्रार हेच मिळाले; पण दुसरे स्थान मात्र गळ्यावर विशुद्धचक्र न मिळता विशुद्धचक्राच्या
२ सें.मी. डावीकडे मिळाले. पाच मिनिटे त्या स्थानांवर नामजपादी उपाय केल्यावर पुन्हा गळ्यावरील त्रासाचे स्थान पालटले होते आणि ते वरच्या दिशेला सरकून हनुवटीच्या खाली आले होते. मी त्या स्थानावर, तसेच सहस्रारवर आधीचीच मुद्रा आणि नामजप करून ५ मिनिटे उपाय केले. त्यानंतर पुन्हा ते न्यासस्थान पालटले आणि ते तोंडाच्या खालच्या जबड्यावर डावीकडील पहिल्या उपदाढेवर (सुळ्याच्या बाजूच्या उपदाढेवर) मिळाले.
तेव्हा मला लक्षात आले, ‘त्या संतांची ही डावीकडील दाढ दुखत आहे आणि दाढेचे दुखणे वाढल्यामुळे त्या संतांचा डावा कान दुखत आहे.’ यावरून ‘कान दुखण्याचे मूळ कारण दाढेचे दुखणे आहे’, हे मला समजले. मी त्या संतांना ‘तुमची खालच्या जबड्याची डावीकडील पहिली उपदाढ दुखत आहे का ?’, असे विचारले. यावर त्यांनी ‘ती दाढ ४ दिवसांपासून दुखत आहे; पण काही कारणाने मला दाताच्या डॉक्टरकडे जाणे जमले नाही’, असे सांगितले. तसेच त्यांनी ‘दाढ दुखत असल्याचे तुम्हाला कसे कळले ?’, असे विचारून आश्चर्य व्यक्त केले !
यावरून ‘प्राणशक्तीवहन उपायपद्धती’मुळे एखाद्या विकाराचे मूळ कारण कसे कळते ?’, हे लक्षात आले. (अधिक माहितीसाठी सनातन संस्थेने प्रकाशित केलेले ग्रंथ ‘विकार-निर्मूलनासाठी प्राणशक्ती (चेतना) वहन संस्थेतील अडथळे कसे शोधावेत ?’ आणि ‘प्राणशक्तीवहन संस्थेतील अडथळ्यांमुळे होणार्या विकारांवर करायचे उपाय’ हे वाचा !) सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामुळे ही आध्यात्मिक स्तरावरील उपाय करण्याची पद्धत साधकांना ज्ञात झाली. यासाठी आम्ही साधक त्यांच्या चरणी कोटीश: कृतज्ञता व्यक्त करतो !’
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (६.७.२०२२)
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |