सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाची ‘प्लेसमेंट’ची टक्केवारी घसरली !

पुणे – विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठामध्ये ‘प्लेसमेंट विभाग’ (योग्य व्यक्तीस नोकरी देणे) वर्ष २०१७ मध्ये चालू करण्यात आला आहे. तेव्हापासून आतापर्यंत केवळ १ सहस्र ८८८ विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली आहे. त्यामुळे मागील ४ वर्षांपूर्वी ८९ टक्क्यांवर असलेली ‘प्लेसमेंट’ची टक्केवारी घसरली आहे.

जानेवारी २०१७ मध्ये चालू केलेल्या ‘प्लेसमेंट विभागा’वर आजपर्यंत ३४ लाख १० सहस्र ७४५ रुपयांचा व्यय करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण आणि नोकर्‍यांची उपलब्धता करणे या विभागाचे प्रमुख कार्य आहे; परंतु ६ सहस्र १२६ अर्जांपैकी केवळ १ सहस्र ८८८ जणांना नोकरी मिळाली आहे. वर्ष २०२२ मध्ये आजपर्यंत १३० विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली आहे. हीच संख्या वर्ष २०१९ मध्ये केवळ ३४ एवढीच होती. ‘प्लेसमेंट’च्या कार्यपद्धतीतच दोष असल्याचा आरोप ‘स्टुडंट हेल्पिंग हँड’चे अध्यक्ष कुलदीप आंबेकर यांनी केला आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचे प्रभारी कुलगुरु डॉ. संजीव सोनवणे म्हणाले, ‘‘कोरोनाच्या संसर्गामुळे अगदी प्रवेशापासून ते ‘प्लेसमेंट’पर्यंतच्या सर्व प्रक्रिया प्रभावित झाल्या आहेत. ‘प्लेसमेंट विभागा’चा आम्हीही आढावा घेत असून यासंबंधी आवश्यक उपाययोजना करत आहोत.’’

संपादकीय भूमिका

उदासीन आणि असंवेदनशील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासन ! नोकरीपासून वंचित राहिलेल्या मुलांची हानी कधीतरी भरून निघेल का ? पुन्हा असे होऊ नये, यासाठी अशा असंवेदनशील अधिकार्‍यांना कठोर शिक्षा करायला हवी !