कुतुबमिनारच्या जमिनीवरील दावेदाराच्या याचिकेला पुरातत्व विभागाचा विरोध

नवी देहली – देहलीतील कुतुबमिनार परिसरातील हिंदू आणि जैन मंदिरांच्या जीर्णोद्धाराशी संबंधित प्रकरणातील कुंवर महेंद्र ध्वज प्रसाद सिंह यांच्या हस्तक्षेप याचिकेला भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने विरोध केला आहे. कुंवर महेंद्र ध्वज प्रसाद सिंह यांनी त्यांच्या याचिकेत स्वत:ला तत्कालीन आगरा प्रांताचे उत्तराधिकारी म्हटले आहे. त्यानुसार दक्षिण देहलीतील ज्या जमिनीवर कुतुबमिनार बांधला आहे, त्या जमिनीचेही ते वारस आहेत. याचिकेत त्यांनी आगरापासून मेरठपर्यंत यमुना नदी आणि गंगा नदी यांच्यामधला भाग, अलीगड, बुलंदशहर आणि गुरुग्राम यांवर हक्क मागितला आहे.

पुरातत्व विभागाने युक्तीवाद केला की, याचिकाकर्त्याने ज्या जमिनीच्या मालकीचा दावा केला आहे, त्याविषयी त्याने स्वातंत्र्यानंतर याविषयी कोणत्याही न्यायालयात दाद मागितलेली नाही किंवा कायद्यानुसार त्याची मागणीही केलेली नाही. पुरातत्व विभाग १९१३ पासून कुतुबमिनारची देखभाल करत आहे. त्यावेळीही जमिनीच्या मालकी हक्कासाठी कोणीही दाद मागितली नव्हती. त्यामुळे या याचिकेवर विचार करण्याचे कोणतेही औचित्य नाही. या प्रकरणी पुढील सुनावणी १३ सप्टेंबरला होणार आहे.