मुंबई, २३ ऑगस्ट (वार्ता.) – राज्यात धर्मांतर बंदी कायद्याची आवश्यकता आहे. सरकार याविषयी टाळाटाळ करत आहे. धर्मांतरामुळे हिंदूंचे धार्मिक स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. याविषयी निवृत्त न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या समितीने महाराष्ट्रात धर्मांतर बंदी कायदा लागू करण्याची शिफारस केली आहे. त्यानुसार राज्यात तात्काळ धर्मांतर बंदी कायदा लागू करावा, अशी मागणी विधानसभेचे शिवसेनेचे पक्ष प्रतोद भरतशेठ गोगावले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली.
भरतशेठ गोगावले यांनी पत्रासमवेत हिंदु जनजागृती समितीने दिलेले निवेदनही जोडले आहे. पत्रात म्हटले आहे की, धर्मांतर बंदी कायद्यासंदर्भात सरकारकडे काही महत्त्वाच्या व्यक्ती, आमदार, सामाजिक संघटना यांनीही पत्रव्यवहार केला आहे; मात्र सरकारने याकडे दुर्लक्ष केले आहे. याचा परिणाम राज्यात धर्मांतराच्या घटना सतत वाढत आहेत. प्रलोभने, फसवणूक आणि बळजोरी करणे यांद्वारे गरीब हिंदूंचे धर्मांतर केले जात आहे. त्यामुळे हिंदु समाजामध्ये तीव्र असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. धर्मांतर रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने वेळ न दवडता राज्यात तात्काळ धर्मांतर बंदी कायदा लागू करावा.