प्रशासनाने ‘कृत्रिम तलाव’ आणि ‘श्री गणेशमूर्तीदान’ या धर्मबाह्य संकल्पना न राबवता पंचगंगा नदीत श्री गणेशमूर्ती विसर्जनास अनुमती द्यावी ! – हिंदु जनजागृती समितीचे निवेदन

निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके (डावीकडे) यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

कोल्हापूर, २३ ऑगस्ट (वार्ता.) – इचलकरंजी येथील समस्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, तसेच विविध संघटना यांनी पंचगंगा नदीत श्री गणेशमूर्ती विसर्जनास अनुमती देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. त्याच प्रकारे कोल्हापुरातही प्रशासनाने ‘कृत्रिम तलाव’ आणि ‘श्री गणेशमूर्तीदान’ या धर्मबाह्य संकल्पना राबवू नयेत अन् पंचगंगा नदीत मूर्ती विसर्जनास अनुमती द्यावी, या मागणीचे निवेदन २२ ऑगस्ट या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले. हे निवेदन प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी श्री. दत्तात्रय कवितके यांनी स्वीकारले. या संदर्भात समितीने नुकतीच पत्रकार परिषदही घेतली होती. या प्रसंगी हिंदुत्वनिष्ठ श्री. शरद माळी, तसेच हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री मधुकर नाझरे, शिवानंद स्वामी, प्रीतम पवार, आदित्य शास्त्री उपस्थित होते.