स्वतःत पालट घडवण्यासाठी तळमळीने प्रयत्न करणारी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. दिव्या पुष्कराज जोशी (वय ६ वर्षे) !

‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

आषाढ कृष्ण द्वितीया (१५.७.२०२२) या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात रहाणारी कु. दिव्या पुष्कराज जोशी हिचा ६ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त तिच्या आई-वडिलांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये आणि तिच्यात झालेले पालट पुढे दिले आहेत.     

‘वर्ष २०१७ मध्ये ‘कु. दिव्या पुष्कराज जोशी महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आली असून ती  ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची आहे’ , असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२२ मध्ये तिची पातळी ६२ टक्के झाली आहे. आता तिच्यातील भाव, साधनेची तळमळ आणि पालकांनी केलेले योग्य संस्कार यांमुळे तिची साधनेत प्रगती होत आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१०.८.२०२२)

(‘वर्ष २०१७ मध्ये कु. दिव्या हिची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के होती.’ – संकलक)

कु. दिव्या पुष्कराज जोशी

कु. दिव्या पुष्कराज जोशी हिला ६ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !  

१. सौ. प्रज्ञा पुष्कराज जोशी (आई), सनातन आश्रम, देवद, पनवेल.

१ अ. प्रेमभाव : ‘कु. दिव्या तिचा आवडणारा पदार्थ सर्वांना देऊन मग स्वतः खाते.

१ आ. ती दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचण्याचा प्रयत्न करते. तिला त्यातील दैवी बालकांविषयीचे लेख, तसेच अन्य लिखाणही वाचायला आवडते.

१ इ. धर्माचरण करणे : दिव्या प्रतिदिन कुंकू लावते. ती सकाळी उठल्यावर आणि अंघोळीच्या वेळी श्लोक म्हणते, तसेच  घरातील मोठ्यांना नमस्कार करते. आश्रमात प्रतिदिन सायंकाळी सर्व बालसाधकांसह एकत्र बसून मारुति स्तोत्र आणि श्रीरामरक्षा म्हणते.

सौ. प्रज्ञा पुष्कराज जोशी

१ ई. सात्त्विक गोष्टींची आवड

१. तिला पारंपरिक वेशभूषा, उदा. नऊवारी साडी, परकर-पोलके आवडते. तिला अलंकार घालायलाही पुष्कळ आवडते. ‘त्यातून तिला चैतन्य मिळते’, असेही ती म्हणते. तिला लांब केस, वेणी किंवा अंबाडा आवडतो.

२. दिव्याला घरी रहाण्यापेक्षा आश्रमात जायला आवडते.

१ उ. व्यष्टी साधनेचे गांभीर्य

१. दिव्या प्रतिदिन तिच्या नामजपाच्या वहीत नामजप लिहिते.

२. ती प्रतिदिन रात्री झोपण्यापूर्वी प्रार्थना, कृतज्ञता, क्षमायाचना, आत्मनिवेदन आणि सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे नामजपाची मानसपेटी करूनच झोपते. मी कधी विसरले, तर ती मलाही त्याची आठवण करते. तिला रात्री झोपण्यापूर्वी सद्गुरु राजेंद्रदादांच्या आवाजातील देहशुद्धीचे ध्वनीमुद्रण ऐकायला आवडते.

३. तिने ‘स्वयंसूचना सत्र कसे बनवायचे ?’, हे शिकून घेतले आहे. त्याप्रमाणे तिने स्वयंसूचना देण्यास आरंभ केला आहे. मी तिला दिवसभरातील व्यष्टी साधनेच्या प्रयत्नांची चिंतन सारणी बनवून दिली आहे. त्याप्रमाणे ‘तिचे प्रयत्न होत आहेत का ?’, याकडे ती लक्ष देते आणि ‘त्या दृष्टीने प्रयत्न कसे वाढतील ?’, याकडे तिचा कल आहे.

४. ती स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनाविषयीचे लिखाण करण्याचा प्रयत्न करते. ती मला ‘आज माझ्याकडून कोणती चूक झाली ?’, हे विचारून त्याप्रमाणे न्यूनतम १ चूक सारणीत आणि आश्रमातील फलकावरही लिहिते.

५. तिला तिची चूक लक्षात आल्यावर किंवा तिची चूक सांगितल्यावर ती स्वतःचे कान धरून क्षमायाचना करते. स्वतःला शिक्षा म्हणून ती उठाबशा काढते.

१ ऊ. नामजपाची आवड 

१. आश्रमात असतांना मला सेवेला जायचे असल्यास ती मला म्हणते, ‘‘मला आणखी नामजप करायचा आहे. मी ध्यानमंदिरात एकटी बसते. तू सेवेला जाऊ शकतेस.’’

२. ती रात्री झोपतांनाही ‘काऊंटर’ किंवा जपमाळ घेऊन नामजप करत झोपते. तिच्याकडे पाहिल्यावर ‘तिचा झोपेतही नामजप चालू आहे’, असे मला जाणवते.

१ ए. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ हातात दिल्यावर दिव्याचा त्रास न्यून होणे : तिला कधी त्रास होत असल्यास, तिची चिडचिड होत असल्यास किंवा ती रडत असल्यास तिला ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ हातात दिल्यावर ती शांत होते. ती तो ग्रंथ १५ ते ३० मिनिटे वाचत बसते. ‘त्या ग्रंथामुळे तिला चैतन्य मिळून ती शांत होते’, असे मला जाणवते.

१ ऐ. भाव ठेवून कृती करण्याचा प्रयत्न करणे : प्रत्येक कृतीला भावाची जोड देण्याचे सूत्र तिला समजल्यापासून ती प्रत्येक कृती करतांना भाव ठेवण्याचा प्रयत्न करते. एकदा मी उन्हात धान्य वाळत ती पण तिच्या परिने धान्य पसरू लागली.  मी तिला विचारले, ‘‘तू काय भाव ठेवला आहेस ?’’ तेव्हा तिने क्षणाचाही विलंब न करता सांगितले, ‘‘मी हे धान्य परात्पर गुरु डॉक्टरांसाठी वाळवत आहे. ते शिजवून मी त्यांना देणार आहे.’’ हे ऐकून मला तिचे पुष्कळ कौतुक वाटले. तेव्हा ती केवळ ४ वर्षांची होती.

१ ओ. कु. दिव्यामध्ये जाणवलेले पालट : दिव्याने स्वतःतील ‘चिडचिडेपणा, रागीटपणा आणि ‘मनाप्रमाणे व्हावे’, असे वाटणे’, या स्वभावदोषांवर मात करण्यासाठी आश्रमातील फलकावर नियमितपणे चुका लिहिल्या. आता तिच्या स्वभावात पुढीलप्रमाणे पालट जाणवतात.

१. आता दिव्या पूर्वीच्या तुलनेत शांत झाली आहे.

२. पूर्वी ‘तिने सांगितल्याप्रमाणे इतर बालसाधकांनी खेळावे आणि ऐकावे’, असा तिचा आग्रह असायचा. काही कारणाने भांडण होऊन ती रडायची. आता ती इतर बालसाधकांचे ऐकून त्याप्रमाणे खेळते. ती त्यांच्याशी जुळवून घेते आणि त्यांना स्वतःची खेळणी खेळायलाही देते.

१ औ. अनुभूती – दिव्यामुळे घरातील वातावरण आनंदी असणे : माझ्या आईच्या (श्रीमती अनुराधा मुळ्ये (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) यांच्या)) मेंदूमध्ये गाठ झाली आहे. तिच्या साहाय्यासाठी मी १ मास दिव्यासह आईकडे माहेरी रहायला गेले होते. एकदा दिव्या २ दिवसांसाठी तिच्या वडिलांच्या समवेत तिच्या आजीकडे (वडिलांच्या आईकडे) गेली होती. दिव्या गेल्यावर आईला थकवा आल्यास ती काही वेळा नकारात्मक बोलायची आणि निराश व्हायची; परंतु ‘दिव्या घरी असतांना घरातील वातावरण आनंदी असायचे अन् आईही स्थिर असायची’, असे मला जाणवले.’

श्री. पुष्कराज जोशी

२. श्री. पुष्कराज जोशी (वडील), सनातन आश्रम, देवद, पनवेल.

अ. ती तिच्या वस्तू व्यवस्थित आणि जागच्या जागी ठेवण्याचा प्रयत्न करते. ती प्रत्येक कृती परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करते.

आ. दिव्याला एखादी गोष्ट समजावून सांगितल्यावर तिला ती लगेच कळते. पुढच्या वेळी ती त्या गोष्टी लक्षात ठेवून आठवणीने त्याप्रमाणे कृती करते.

२ ई. कु. दिव्यामधील स्वभावदोष : उद्धटपणा

‘हे गुरुमाऊली, ‘दिव्यासारखी दैवी बालिका तुम्हीच आम्हाला दिली आहे’, त्याबद्दल तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : १९.६.२०२२)


यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक