पुणे – शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अपप्रकारात अपात्र ठरवण्यात आलेल्या ५७६ शिक्षकांना ऑगस्टपासून वेतन न देण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालक डॉ. दिनकर पाटील यांनी दिले आहेत. ऑनलाईन किंवा ऑफलाईन कोणत्याही पद्धतीने वेतन अनुदान दिले जाणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. डॉ. पाटील यांनी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, जिल्हा परिषदांचे प्राथमिक शिक्षणाधिकारी, भविष्य निर्वाह निधी पथक, महापालिकांचे प्रशासन अधिकारी, नगरपालिका, नगर परिषद आणि कटक मंडळाचे अधिकारी यांना पत्रे दिली. वर्ष २०१९ मध्ये अपप्रकार केलेल्या ७ सहस्र ८७४ उमेदवारांपैकी ५७६ अपात्र उमेदवार जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद, कटक मंडळ, खासगी अनुदानित, अंशतः अनुदानित, प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळेत शिक्षण सेवक किंवा सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते वेतन अनुदान घेत आहेत. संबंधित अधिकार्यांवर नियमानुसार कारवाई होईल, अशी चेतावणीही दिली आहे.