अनुमती देण्याच्या नावाखाली व्यापार्‍यांची अडवणूक थांबवा ! – आमदार विजयकुमार देशमुख, भाजप

विजयकुमार देशमुख

सोलापूर – २ वर्षांनी कोरोना महामारीच्या कालावधीनंतर गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी शासनाने अनुमती दिली आहे. वर्षानुवर्षे चालत आलेल्या टिळक चौक, मधला मारुति ते कौतम चौक रस्त्यावर श्री गणेशमूर्तींची विक्री, तसेच गौरींचे मुखवटे यांच्या विक्रीसाठी दुकानाच्या बाहेर व्यापारी ५ फुटांचा मंडप घालतात; मात्र महापालिका प्रशासन अनुमती देण्याच्या नावाखाली व्यापार्‍यांची अडवणूक करत आहे. हा प्रकार थांबायला हवा, अशी मागणी भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी केली.

आमदार देशमुख यांनी २० ऑगस्ट या दिवशी व्यापार्‍यांसह महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांची भेट घेऊन चर्चा केली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले, ‘‘पोलीस प्रशासनाने व्यापार्‍यांना वेठीस धरू नये. शहरात वाढत चाललेले अवैध धंदे बंद करण्याकडे लक्ष द्यावे. विनाकारण नियमात राहून व्यापार्‍यास वेठीस धरू नये. प्रथम अवैध धंदे चालकांवर कारवाई करावी.’’