वीज आणि पाणी ग्राहकांसाठी ‘क्यू.आर्. कोड बिलींग’ सुविधा उपलब्ध करणारे गोवा हे देशातील पहिले राज्य ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

(‘क्यू.आर्. कोड’ : ‘क्विक रिस्पॉन्स कोड’ म्हणजे ‘बारकोड’प्रमाणे असलेली एक प्रकारची सांकेतिक भाषा)

केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते पाणी ग्राहकांसाठी ‘क्यू.आर्. कोड बिलींग’ सुविधेचा शुभारंभ

पणजी, २० ऑगस्ट (वार्ता.) – वीज आणि पाणी ग्राहकांसाठी ‘क्यू.आर्. कोड बिलींग (देयक)’ सुविधा उपलब्ध करणारे गोवा राज्य हे देशातील पहिले राज्य आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते पाणी ग्राहकांसाठी ‘क्यू.आर्. कोड बिलींग’ सुविधेचा १९ ऑगस्ट या दिवशी शुभारंभ केला. ‘जल शक्ती मिशन’अंतर्गत ‘हर घर जल’ उत्सव कार्यक्रमाच्या वेळी केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी या सुविधेचा शुभारंभ केला.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले,

‘‘स्मार्ट वॉटर मिटरींग’च्या माध्यमातून महसूल गोळा करणारे गोवा हे देशातील पहिले राज्य आहे. गोव्यातील पिण्याचे पाणी १४ राष्ट्रीय मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमधून तपासले जाते.’’ तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘व्हिडिओ मॅसेज’च्या माध्यमातून या कार्यक्रमाला संबोधित केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यातील प्रत्येक घर नळाच्या पाण्याने जोडले गेल्याने ‘हर घर जल’ प्रमाणपत्र प्राप्त झालेले गोवा राज्य हे देशातील पहिले राज्य असल्याचे म्हटले.