वर्ष २०२२ च्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी महर्षींच्या आज्ञेने होत असलेला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा पाद्यपूजन सोहळा पहातांना साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

‘महर्षींच्या आज्ञेने या वर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रत्यक्ष गुरूंचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे) पाद्यपूजन होणार आहे’, हे कळल्यावर मी भावविभोर झाले. त्याआधी मी ध्यानमंदिरात बसून गुरूंचे मानस पाद्यपूजन केले होते. आता मला गुरूंचा पाद्यपूजन सोहळा ‘ऑनलाईन’ पहायला मिळणार होता.

१. गुरूंचे पाद्यपूजन होत असलेल्या ठिकाणी मानसरित्या फूल बनून जाण्याचा विचार आल्यावर पिवळे शेवंतीचे फूल दिसणे

सौ. वृंदा मराठे

तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘या स्थूलदेहाला मर्यादा आहेत; मात्र मला मानसरित्या फूल बनून निश्चितच तिथे जाता येईल.’ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे पाद्यपूजन चालू असतांना मी मनाने फूल बनून तिथे जाण्याचा प्रयत्न करत होते. माझ्या मनात फूल बनण्याचा विचार आला आणि लगेच मला पिवळे शेवंतीचे फूल दिसले. तेव्हा मला वाटले, ‘या फुलाला सुगंध नाही. मी मोगरा किंवा जुईचे फूल बनले असते, तर बरे झाले असते.’

२. त्याच वेळी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी शेवंतीच्या फुलांना सुगंधित अत्तर लावून त्या फुलांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या चरणांना अत्तर लावले. ते पाहून मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.

३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची जाणवलेली महानता !

देवाने मला यातून दाखवून दिले की, ‘फूल सुगंधी नसले, तरी जे आहे, त्याला गुरूच सुगंध आणू शकतात.’ ‘साधक ज्या स्थितीत आहेत, त्या स्थितीत साधकांना गुरूंनी चरणांशी घेतले आहे’, याचीच त्यांनी प्रचीती दिली.’

– सौ. वृंदा विरेंद्र मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.७.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक