कोल्हापूर शहराचे प्रवेशद्वार असलेल्या तावडे हॉटेल चौकातील राष्ट्रीय महामार्गावरील पुलाखालील वाहतुकीची कोंडी सोडवा ! – राजू यादव, शिवसेना करवीर तालुकाप्रमुख

कोल्हापूर, १९ ऑगस्ट (वार्ता.) – गणेशोत्सव, दसरा, दीपावली या कालावधीत कोल्हापूर शहरात येणार्‍या भाविकांची संख्या मोठी असून शहरात येणार्‍या वाहनांची संख्याही अधिक आहे. तावडे हॉटेल चौकामध्ये पूल अरूंद असल्याने, तसेच गांधीनगरलाही खरेदीसाठी जाणारी वाहनांची संख्या अधिक असल्याने तावडे हॉटेल पुलाखाली वाहतुकीची मोठी कोंडी होते. त्या वेळी १ ते दीड घंटा वाहतुकीच्या कोंडीचा त्रास शहरात येणार्‍या आणि गांधीनगरला खरेदीसाठी जाणार्‍यांना होतो. त्यासाठी कोल्हापूर शहराचे प्रवेशद्वार असलेल्या तावडे हॉटेल चौकातील राष्ट्रीय महामार्गावरील पुलाखालील वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी प्रशासनाने योग्य प्रयत्न करावेत, या मागणीचे निवेदन शिवसेनेचे करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी यांना देण्यात आले.

या प्रसंगी उपजिल्हाप्रमुख अवधूत साळोखे, उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, कामगार सेना जिल्हाप्रमुख राजू सांगावकर, विक्रम चौगुले, दीपक रेडेकर, हिंदुत्वनिष्ठ शरद माळी, योगेश लोहार, शैलेश नलवडे, बाळासाहेब नलवडे यांसह अन्य उपस्थित होते.

संपादकीय भूमिका

अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाला जनतेच्या अडचणी समजत नाहीत का ? की प्रशासनाला त्या सोडवाव्या वाटत नाहीत ?