देशप्रेम हवे !

युरोप खंडातील सर्वांत उंच शिखर एल्ब्रुस (५ सहस्र ६४२ मीटर)

प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तीगत जीवनाचे ध्येय निरनिराळे असते. यामध्ये ‘व्यक्ती तितक्या प्रकृती तितके ध्येय’, असे म्हणता येईल. त्यानुसार अनेकांचे चांगल्या वेतनाची नोकरी, परदेशवारी हे ऐहिक सुख देणारे; तर काहींचे सामाजिक, धार्मिक, ऐतिहासिक कार्य करण्याचे ध्येय असते. ध्येय ठरवतांना स्वतःच्या खर्‍या खुर्‍या आवडीनिवडी, कल यांपेक्षा ‘आपल्याला चांगले काय जमते ?’, हे महत्त्वाचे असते. त्यामध्येही ‘जे जमते त्यामध्ये देशाची मान उंचावेल, असे काय करता येईल ?’, असा विचार असेल, तर हे ध्येय आदर्शच म्हणावे लागेल. असाच विचार करून एक आगळेवेगळे ध्येय निवडणारे तरुण श्री. योगेश प्रकाश बडगुजर आहेत.

श्री. योगेश बडगुजर हे जळगाव येथील एक गिर्यारोहक आहेत. यांनी १५ ऑगस्ट या दिवशी सकाळी ८ वाजून ३० मिनिटांनी युरोप खंडातील सर्वांत उंच शिखर एल्ब्रुस (५ सहस्र ६४२ मीटर) सर करून भारत देशाचा तिरंगा ध्वज मोठ्या डौलाने फडकावत खानदेशासह देशाची मान उंचावली ! यापूर्वी त्यांनी २५ जून २०२२ या दिवशी आफ्रिका खंडातील सर्वांत उंच शिखर माऊंट किलिमांजारो (५ सहस्र ८९५ मीटर) सर केले होते. श्री. बडगुजर हे अत्यंत सामान्य कुटुंबातील तरुण असून त्यांना लहानपणापासून गिर्यारोहणाची आवड आहे. श्री. योगेश हे मुंबई महानगरपालिकेतील अग्नीशमनदलात ५ वर्षांपासून ‘फायरमन’ पदावर कार्यरत आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील सोंडाई, कर्नाळा, पेबविकट, कळसुबाई आणि माहुली, तसेच सिक्कीममधील रेनॉक आदी शिखरे सर केली आहेत. श्री. योगेश यांनी जगातील ७ खंडांपैकी युरोप, आफ्रिका या खंडातील सर्वोच्च शिखरे पादाक्रांत केली आहेत. त्यांचा आता उत्तर आणि दक्षिण अमेरिका खंड, अंटार्टिका अन् ऑस्ट्रेलिया खंड येथील शिखरे, तसेच जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर (८ सहस्र ८४८.८६ मीटर) पादाक्रांत करण्याचा मानस आहे.

यामध्ये श्री. योगेश यांनी गिर्यारोहणाच्या आवडीमध्ये उंच शिखर सर करून तेथे भारताचा तिरंगा फडकावला. यातून त्यांचे देशप्रेम लक्षात येते. त्यांच्या आवडीमागील देशप्रेम आजच्या तरुणांना नक्कीच प्रेरणा देणारे आहे. आपल्या आवडीनिवडी जोपासतांना त्यामध्ये देशप्रेमाचा विचार सध्याच्या किती तरुणांमध्ये आहे, हा संशोधनाचा विषय होईल. मेकॉलेप्रणित शिक्षणप्रणालीमुळे आजच्या तरुण पिढीमध्ये देशप्रेम शोधावे लागते. या पार्श्वभूमीवर श्री. योगेश यांच्यातील देशप्रेमाचा आदर्श सर्व तरुणांनी घ्यावा, असे वाटते.

– श्री. नीलेश पाटील, जळगाव