‘गेस्ट हाऊस’मधील बनावट पोलीस ठाण्याच्या माध्यमातून खंडणी वसुली !

बिहारमध्ये पुन्हा जंगलराज !

  • ५०० रुपये रोजंदारीवर कार्यरत होते बनावट पोलीस !

  • महिला होती बनावट पोलीस अधिकारी !

पाटलीपुत्र (बिहार) – बिहारमधील बांका जिल्ह्यात ‘अनुराग गेस्ट हाऊस’मध्ये बनावट पोलीस ठाणे चालवण्यात येत होते. येथे काही जणांना पोलीस म्हणून ५०० रुपयांच्या रोजंदारीवर कामावर ठेवण्यात आले होते. पोलीस प्रमुख ते उपअधीक्षक पदापर्यंतच्या नियुक्त्या येथे करण्यात आल्या होत्या. पोलीस अधिकारी म्हणून एक महिला होती. या पोलीस ठाण्याद्वारे सर्वसामान्य लोकांकडून खंडणी वसूल केली जात होती. या प्रकरणी पोलिसांनी २ महिलांसह ४ जणांना अटक केली आहे. पोलिसांच्या चौकशीत त्यांनी सांगितले की, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी त्यांची नियुक्त केली आहे.

१. बांकाचे पोलीस अधीक्षक डॉ. सत्यप्रकाश यांनी सांगितले की, गस्तीच्या वेळी पोलिसांचा गणवेश परिधान केलेली एक महिला दिसली. तिला चौकशीसाठी थांबवण्यात आल्यावर ती पळू लागली. तिला पाठलाग करून पकडण्यात आले. या आरोपींनी ‘स्कॉट पोलीस टीम पटना’ नावाने एक न्यास स्थापन केला होता. त्याआधारे ते पोलीस म्हणून लोकांची भरती करत होते. अटक केलेल्या महिलांची नावे अनिता कुमारी आणि जुली कुमारी असून अन्य दोघा आरोपींची नावे रमेश कुमार अन् आकाश कुमार आहेत. मुख्य आरोपी भोला यादव पसार आहे.

२. अनुराग गेस्ट हाऊसचे संचालक रोहित कुमार मंडल यांनी सांगितले की, हे ५ जण गेल्या अडीच वर्षांपासून प्रतिमहा ३ सहस्र रुपये देऊन येथे रहात होते. त्यांनी ते कंत्राटदार असल्याचे सांगितले होते.