‘मी मार्च २०२१ ते जानेवारी २०२२ या कालावधीत सोलापूर सेवाकेंद्रात रहायला होतो. त्या वेळी पू. दीपाली मतकर यांची मला लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये गुरुचरणी अर्पण करत आहे.
१. प्रेमभाव
अ. ‘पू. दीपालीताईंमध्ये अत्युच्च प्रेमभाव आहे. पू. ताईंचे नाव घेतले, तरी काही साधकांची भावजागृती होते, हे त्यांच्यात असलेल्या प्रेमभावामुळेच शक्य झाले आहे.
आ. ‘कोरोना महामारीच्या कालावधीमध्ये साधक आजारी असतांना ‘ते औषधे घेत आहेत ना ? त्यांचे जेवण व्यवस्थित होत आहे ना ?’, हे सर्व त्या स्वतः पहात असत. त्याचप्रमाणे त्या आठवणीने दोन वेळा त्या साधकांना भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी करत असत.
इ. एकदा मी आजारी असतांना पू. दीपालीताई स्वतः त्यांच्याकडील सेवा सांभाळून आठवणीने दिवसातून २ वेळा येऊन माझ्या प्रकृतीची चौकशी करत असत.
२. साधकांना त्यांच्या क्षमतेप्रमाणे सेवा दिल्याने त्यांना सेवेतील आनंद मिळणे
पू. ताईंना साधकांच्या क्षमतेचा उत्तम अभ्यास आहे. ‘कोणत्या साधकाला कोणती सेवा द्यावी ?’, हे त्या अचूक ओळखून त्याप्रमाणे सेवा देतात. त्यामुळे साधकांनाही सेवेतील आनंद मिळतो आणि साधक पुढच्या टप्प्याला जाण्यासाठी त्याला साहाय्य होते.
३. गुरुकार्याची तीव्र तळमळ
३ अ. ‘सर्व साधकांची आध्यात्मिक प्रगती कशी होईल ?’, यासाठी तळमळणार्या पू. दीपालीताई ! : गुरुकार्याची तीव्र तळमळ हे त्यांचे महत्त्वाचे गुणवैशिष्ट्य आहे. पू. ताई कृष्णाला नेहमी एकच प्रार्थना करतात, ‘कृष्णा, सर्व साधकांना तुझ्या चरणी घे रे !’ हे वाक्य मी त्यांच्या तोंडातून अनेकदा ऐकले आहे. ‘यामध्ये सर्व साधकांची आध्यात्मिक प्रगती कशी होईल ?’, अशी त्यांची तळमळ असते.
३ आ. साधकांना सेवेत साहाय्य करण्याची तळमळ ! : पू. ताई त्यांच्याकडील सर्व सेवा सांभाळून सेवाकेंद्रातील स्वयंपाक सेवेसाठीही वेळ देतात. यामध्ये ‘साधकांना सेवेत साहाय्य व्हावे’, अशी त्यांची तळमळ असते.
३ इ. साधकसंख्या अल्प असतांना पू. ताईंनी स्वतः साधकांसाठी स्वयंपाक बनवणे : एकदा सेवाकेंद्रात साधकसंख्या अल्प असतांना पू. ताईंनी स्वतः साधकांसाठी भाजी आणि पोळ्या करून सर्व पदार्थ भोजनगृहातील पटलावर ठेवले. अशा सेवाही त्या करतात.’
– श्री. ज्ञानदीप गोरख चोरमले (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) (वय २० वर्षे), सोलापूर (७.८.२०२२)