वृंदावनातील श्रीकृष्णाने (श्रीबांके बिहारीने) केलेली लीला

शुक्रवार, १९ ऑगस्ट या दिवशी गोपाळकाला आहे. त्या निमित्ताने…

१. पुजारी भक्तीभावाने पूजा करत असल्याने त्याने रात्रीच्या वेळी ठेवलेला नैवेद्य श्रीबांके बिहारीजींनी (श्रीकृष्णाने) प्रतिदिन ग्रहण करणे

‘फार पूर्वीची गोष्ट आहे. वृंदावनात श्रीबांके बिहारीच्या (श्रीकृष्णाच्या) मंदिरातील पुजारी प्रतिदिन मोठ्या भक्तीभावाने पूजा करत असे. तो प्रतिदिन कृष्णाची आरती करून नैवेद्य दाखवून त्याच्या शयनाची व्यवस्था करत असे. तो नित्यनेमाने रात्रीही कृष्णाच्या पलंगाजवळ ४ लाडू ठेवत असे. ‘रात्री देवाला भूक लागली, तर तो उठून लाडू ग्रहण करील’, असा पुजार्‍याचा भाव असायचा. सकाळी मंदिराचे द्वार उघडताच त्याला पलंगावर प्रसाद विखुरलेला दिसायचा. त्यामुळे तो त्याच भावाने प्रतिदिन भक्तीभावाने लाडू ठेवत असे.

२. एकदा मंदिरातील पुजारी कृष्णाला लाडवाचा नैवेद्य ठेवण्यास विसरणे आणि बालरूपातील श्रीकृष्णाने ज्या दुकानदाराकडून मंदिरात लाडू येत असत, त्याच्याकडे जाऊन चार लाडू मागून घेणे

एकदा रात्री पुजार्‍याने कृष्णाच्या शयनाची सिद्धता केली; पण तो त्याच्यासाठी लाडू ठेवायला विसरला. त्याने मंदिराचे द्वार बंद केले आणि तो घरी निघून गेला. रात्री सुमारे १ – २ वाजता ज्या दुकानातून मंदिरात लाडू येत होते, ते दुकान उघडे होते. दुकानदार दुकान बंद करून निघणार, तेवढ्यात एक लहान मुलगा तिथे आला आणि म्हणाला, ‘‘बाबा, मला बुंदीचे लाडू हवे आहेत.’’ दुकानदाराने सांगितले, ‘‘बाळा, लाडू संपले आहेत आणि मीपण आता दुकान बंद करून जात आहे.’’ त्या वेळी ते लहान बालक म्हणाले, ‘‘आत जाऊन बघा. चार लाडू आहेत.’’ मुलाने हट्टच धरल्यावर दुकानदार आत गेला. तेव्हा त्याला तेथे ४ लाडू दिसले; कारण आज त्याने मंदिरात लाडू पाठवलेच नव्हते.

३. त्या मुलाने लाडवांचे मूल्य म्हणून पैसे न देता दुकानदाराला हातातील सोन्याचे कडे काढून देणे

दुकानदाराने सांगितले, ‘‘याचे मला पैसे दे.’’ त्यावर तो लहान मुलगा म्हणाला, ‘‘माझ्याजवळ पैसे नाहीत.’’ लगेचच त्याने आपल्या हातातील सोन्याचे कडे काढले आणि दुकानदाराला देऊ केले. त्यावर दुकानदार म्हणाला, ‘‘बाळा पैसे नाहीत, तर असू दे. तुझ्या वडिलांना सांग. उद्या मी त्यांच्याकडून घेईन’’; पण तो मुलगा ऐकायला तयार नव्हता. त्याने हातातील सोन्याचे कडे दुकानात ठेवले आणि तो निघून गेला. सकाळी पुजार्‍याने मंदिराचे द्वार उघडताच त्याला श्रीकृष्णाच्या मूर्तीच्या हातात कडे नसल्याचे लक्षात आले. ‘चोराने चोरले’, असे म्हणावे, ‘तर केवळ कडेच कसे चोरले ?’, असा प्रश्न त्याला पडला. थोड्या वेळाने ही बातमी मंदिरात आणि बाहेर सर्वत्र पसरली.

४. भक्तीमध्ये लीन झालेला भक्त एखादी सेवा करण्यास विसरला, तरी देेव स्वतः ती पूर्ण करवून घेत असणे

त्या दुकानदाराला ही बातमी कळल्यावर त्याला रात्रीचा प्रसंग आठवला. त्याने दुकानात जाऊन त्याच्याकडील कडे शोधले. त्याने ते पुजार्‍याला दाखवून रात्री घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. त्या वेळी पुजार्‍याला रात्री देवासाठी लाडू ठेवायला विसरल्याचे लक्षात आले आणि ‘त्यासाठीच श्रीकृष्ण स्वतःच लाडू घेण्यासाठी आला होता’, हे त्याच्या लक्षात आले.

तात्पर्य : भक्तीमध्ये लीन असलेला भक्त जरी एखादी सेवा करण्यास विसरला, तरी देव स्वतः ती पूर्ण करवून घेतो.’

(संदर्भ : अज्ञात)