खंडित वीजपुरवठ्यावरून मालवणमधील महिला आणि व्यापारी यांचा महावितरणच्या अधिकार्‍यांना घेराव !

मालवण – शहरात सातत्याने उद्भवणार्‍या वीजपुरवठ्याच्या समस्या त्वरित सोडवाव्यात, या मागणीसाठी मालवणमधील महिला आणि व्यापारी यांनी १७ ऑगस्ट या दिवशी महाराष्ट्र राज्य वीज वितरण आस्थापनाच्या (महावितरणच्या) येथील कार्यालयात जाऊन अधिकार्‍यांना घेराव घातला अन् खडसावले.

या वेळी मांडण्यात आलेल्या समस्या आणि करण्यात आलेल्या मागण्या

१. शहरातील भरड परिसर आणि बाजारपेठ येथे गेले काही दिवस सातत्याने वीजपुरवठा खंडित होण्यासह अल्प दाबाने वीजपुरवठा होत आहे. गणेशोत्सव जवळ आला असून वीजपुरवठ्याच्या समस्येमुळे गृहिणींना, तसेच व्यापार्‍यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

२. शहरातील भरड नाक्यावरील विद्युत रोहित्रातून (ट्रान्सफॉर्मरमधून) भरड परिसर आणि बाजारपेठ येथे वीजपुरवठा चालू होता; मात्र काही दिवसांपूर्वी येथील विद्युत रोहित्र अन्यत्र हालवण्यात आले असून एस्.टी. बसस्थानकानजीकच्या रोहित्रातून वीजपुरवठा केला जात आहे. या ठिकाणाहून वीजपुरवठा चालू झाल्यापासून सातत्याने अल्प दाबाचा वीजपुरवठा होत असून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाणही वाढले आहे.

३. ८ ऑगस्टला वीजपुरवठा सलग ८ घंटे खंडित होता. सायंकाळी तो पूर्ववत् झाला; मात्र लगेच खंडित झाला. त्यामुळे श्री गणेशचतुर्थीच्या पार्श्वभूमीवर व्यापार्‍यांची होणारी हानी टाळण्यासाठी आवश्यक त्या सुधारणा त्वरित कराव्यात.

४. भरड भागातील वीजवाहिन्यांचा सातत्याने झाडांना स्पर्श होऊन ‘शॉर्टसर्किट’ होत असल्याने येथील रहिवासी आणि पादचारी यांनाही धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ही समस्या दूर करावी, अशी मागणी उपस्थित नागरिकांनी केली. बाजारपेठेतील अनेक भागांमध्ये सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने व्यापार्‍यांची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे.

५. अल्प किंवा अधिक दाबाने होणार्‍या विजपुरवठ्यामुळे एका मासात अनेकांचे इन्र्व्हटर (मुख्य वीजपुरवठा खंडित झाल्यावर उपकरणांना वीजपुरवठा करणारे यंत्र), पंखे, दूरदर्शन संच जळाले.