‘आझादी का अमृत महोत्सव’निमित्त पणजी येथे भरवलेल्या प्रदर्शनात कुंकळ्ळीतील उठावाविषयी चुकीचा इतिहास प्रदर्शित !

  • कुंकळ्ळी महानायक स्मृती ट्रस्टच्या वतीने घटनेचा तीव्र निषेध

  • घटनेचे अन्वेषण करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी

मडगाव, १६ ऑगस्ट (वार्ता.) – ‘आझादी का अमृत महोत्सव’ मोहिमेच्या निमित्ताने पणजी येथे कदंब बसस्थानकावर भरवलेल्या प्रदर्शनात कुंकळ्ळीच्या उठावाविषयी चुकीचा इतिहास प्रदर्शित करण्यात आला आहे. या घटनेचा ‘कुंकळ्ळी महानायक स्मृती ट्रस्ट’ने मडगाव येथे एक पत्रकार परिषद घेऊन तीव्र निषेध व्यक्त केला असून याला उत्तरदायी असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पत्रकार परिषदेला ‘कुंकळ्ळी महानायक स्मृती ट्रस्ट’चे अध्यक्ष ऑस्कर मार्टीन आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
‘कुंकळ्ळी महानायक स्मृती ट्रस्ट’ने पत्रकार परिषदेत पुढील सूत्रे मांडली.

१. कुंकळ्ळी येथे उठाव झाल्यानंतर कुंकळ्ळी येथील महानायकांना असोळणा किल्ल्यावर बोलावून त्यांची हत्या करण्यात आली. यानंतर तेथील एक महानायक साळ नदीत उडी घेऊन तेथून कारवार येथे पळून जाण्यास यशस्वी ठरला. हा भाग प्रदर्शनात दिलेला आहे आणि हा भाग बरोबर आहे.

२. प्रदर्शनात पुढे म्हटले आहे की, ‘महानायकांची हत्या केल्यानंतर कुंकळ्ळी येथील हिंदु ब्राह्मण जमीनदार, तसेच वेळ्ळी, असोळणा, आंबेली आणि वेरोडा येथील ग्रामस्थ यांनी त्यांच्या कृषी उत्पादनांवरील कर पोर्तुगिजांना देण्यास नकार दर्शवला. यामुळे संबंधित भूमी पोतुगिजांनी कह्यात घेऊन ती ‘कोंडाडो ऑफ द मार्किस ऑफ फ्रंटीयर’ यांना सुपुर्द केली. वास्तविक कपटाने क्षत्रीय देसाई महानायकांची हत्या करण्यात आल्यानंतर उपरोल्लेखित गावातील क्षत्रीय देसाई समाजाने पोर्तुगिजांना कर देण्यास नकार दर्शवला होता आणि यामुळे कुंकळ्ळी येथील क्षत्रीय देसाई समाजावर कारवाई करण्यात आली. यानंतर कुंकळ्ळी येथील ‘गावकरां’नी दीर्घकालीन न्यायालयीन लढा देऊन पोर्तुगिजांनी घेतलेली भूमी पुन्हा कह्यात घेऊन ‘सोसायटी ऑफ क्षत्रीय गावकर ॲग्रीकल्चरिस्ट’ या संघटनेची स्थापना केली. हा न्यायालयीन लढा केवळ गोव्यातच नव्हे, तर तो पोर्तुगाल येथेही लढण्यात आला.

३. कदंब बसस्थानकावर उभारण्यात आलेल्या प्रदर्शनातील चुकीचा इतिहास त्वरित पालटावा आणि या प्रकरणाचे सरकारने अन्वेषण करून इतिहासाचे विकृतीकरण करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी.