सोलापूर शहराचा विकास कधी ?

सोलापूर शहराची लोकसंख्या वर्ष २०११ च्या जनगणनेनुसार ९ लाख ५१ सहस्र इतकी होती. त्यातील १ लाख लोकांनी गोदुताई परूळेकर आणि मीनाक्षीताई साने या वसाहतीत स्थलांतर केले. जिल्ह्यात २ दंतचिकित्सा महाविद्यालये, २ वैद्यकीय महाविद्यालये आणि २२ अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. यातून प्रतिवर्षी पदवी घेऊन बाहेर पडणार्‍या युवकांनी पुणे, मुंबई, बेंगळुरू, भाग्यनगर आणि देहली या मेट्रो शहरांकडे जाणे पसंत केले आहे. आतापर्यंत अनुमाने लाख सोलापूरकर पुणे येथे स्थायिक झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शहरातील लोकसंख्या न्यून होत असतांनाही ते रोखण्यासाठी लोकप्रतिनिधींकडून म्हणावे तसे प्रयत्न का होत नाहीत ? हे विचार करायला लावणारे सूत्र आहे.

सोलापूर जिल्ह्यात उद्योग-व्यवसाय वाढीला पोषक वातावरण आहे, तसेच जिल्ह्यात ४० साखर कारखाने आहेत. दक्षिण भारताला जोडणारे रेल्वेचे जाळे अन् अनेक मोठ्या शहरांना जोडणारे रेल्वे महामार्ग आणि विमानतळ आहे. उजनी धरणाच्या माध्यमातून पाण्याच्या कालव्यांचे जाळे मजबूत आहे. अशा प्रकारे ‘सर्व पोषक वातावरण असतांना सोलापूरच्या विकासामध्ये अडचण काय ?’, हा जनतेला न सुटलेला प्रश्न आहे. यावर लोकप्रतिनिधींनी प्रकाश टाकणे अपेक्षित आहे.

सत्ताकाळात तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी ‘सोलापूरच्या विकासासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची (‘एम्.आय.डी.सी.’ची)’ घोषणा केली होती; मात्र सत्ता पालटानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्यासाठी पाठपुरावा करून प्रयत्न करणे आवश्यक होते; पण तसे झाले नाही. शहराच्या विकासासाठी प्राथमिक सुविधांसमवेत उद्योगांची निर्मिती, नवीन प्रकल्प उभारण्यास युवकांना प्रोत्साहन देणे आवश्यक असते. सोलापूरच्या विकासात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून नवीन उद्योगनिर्मितीसाठी पाठपुरावा घेणे आवश्यक आहे. इच्छुक युवकांना छोटे छोटे प्रकल्प निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवे, तसेच आवश्यक त्या गोष्टींची पूर्तता होण्यासाठी साहाय्य केल्यास अनेक नागरिकांचे शहराबाहेर जाण्याचे प्रमाण न्यून होऊन त्यांची क्षमता आणि बुद्धी कौशल्य यांचा वापर शहराच्या विकासासाठी होईल. यातूनच नवनवीन उद्योग आणि प्रकल्प यांची निर्मिती होऊन लोकांना रोजगार उपलब्ध होईल. असे झाल्यास शहराचा विकास व्हायला वेळ लागणार नाही, हे नक्की !

– वर्षा कुलकर्णी, सोलापूर