सदैव कृतज्ञताभावात रहाणार्‍या आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असणार्‍या जयपूर येथील पू. (श्रीमती) गीतादेवी खेमका (वय ८० वर्षे) !

पू. (श्रीमती) गीतादेवी खेमका यांच्या चरणी ८० व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराचा शिरसाष्टांग नमस्कार !

पू. (श्रीमती) गीतादेवी खेमका यांचा ८० वा वाढदिवस श्रावण कृष्ण षष्ठी (१७.८.२०२२) या दिवशी आहे. त्यानिमित्त त्यांच्या कुटुंबियांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

१. सौ. मेघा पातेसरिया (नात, पू. खेमकाआजींच्या मुलाची (पू. प्रदीप खेमका यांची मुलगी), रानीगंज, बंगाल.

१ अ. प्रेमभाव : ‘पू. खेमकाआजींचे सर्वांवर पुष्कळ प्रेम असून ते त्यांच्या कृतीतून दिसून येते. त्यांचे प्रेम साधक किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य यांवर आहे, असे नसून त्या सर्वांवर प्रेम करतात.

१ आ. कठीण परिस्थिती स्वीकारणे : माझ्या काकांचा (कै. सुदीप खेमका यांचा, पू. खेमकाआजी यांचा दुसरा मुलगा) मृत्यू हा आजींसाठी फार मोठा आघात होता, तरीही घरात कधी त्यांच्या संदर्भात विषय निघाला की, आजी म्हणायच्या, ‘‘त्याचे (सुदीपचे) आयुष्य तेवढेच होते.’’ एवढी बिकट परिस्थिती स्वीकारणे आणि प्रत्येक क्षणी गुरुदेवांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) स्मरण करणे, हे अवघड होते. त्या वेळी त्या आम्हा सर्वांना नामजप करायला सांगायच्या.

१ इ. सदैव अनुसंधानात रहाणार्‍या पू. खेमकाआजी ! : त्या प्रत्येक क्षणी भावावस्थेत असतात. मी त्यांच्याशी केव्हाही बोलले, तरी त्या म्हणतात, ‘‘माझ्या डोळ्यांसमोर सदैव गुरुदेवांचेच (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) रूप उभे रहाते. प्रत्येक क्षणी गुरुदेव सूक्ष्मातून माझ्या समवेत असतात. मला रात्री जाग येते, तेव्हाही मला ते माझ्या समवेत असल्याचे जाणवते.’’ त्यांच्याशी बोलतांना आमचाही भाव जागृत होतो.’

२. श्री. आकाश गोयल (नातू, पू. खेमकाआजींच्या मुलीचा (सौ. पुष्पा गोयल (आध्यात्मिक पातळी ६० टक्के) यांचा) मुलगा, आध्यात्मिक पातळी ६० टक्के), जयपूर

२ अ. परेच्छेने वागणे : ‘पू. आजी घरात कोणत्याही विषयावर आपले स्वतःचे मत व्यक्त करतात; परंतु ‘असेच झाले पाहिजे’, असा त्यांचा कधीही आग्रह नसतो. त्या नेहमी परेच्छेने वागण्याचा प्रयत्न करतात.

२ आ. सर्व आपलेच वाटणे : पू. आजींची प्रकृती अस्वस्थ असतांना एक दिवस अकस्मात् सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका जयपूरमध्ये त्यांना भेटायला आले. तेव्हा पू. आजींना पुष्कळ कृतज्ञता वाटली. त्या म्हणाल्या, ‘‘सर्व आपलेच आहे.’’

२ इ. अपेक्षा न्यून होणे : ‘पूर्वी माझ्या आईने त्यांच्याजवळ रहायला पाहिजे’, असे पू. आजींना वाटत असे; परंतु आता त्यांची ही अपेक्षाही न्यून झाली आहे.

२ ई. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती अखंड कृतज्ञताभाव असणे : पू. आजी काही मासांपूर्वी एकदा रात्रीच्या वेळी प्रसाधनगृहात पाय घसरून पडल्या होत्या. तेव्हा त्यांच्या मनात ‘गुरुदेवांनीच (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनीच) माझे रक्षण केले’, असा कृतज्ञताभाव होता.’

३. सौ. मधुलिका आकाश गोयल, (नातसून, पू. खेमकाआजींच्या मुलीची (सौ. पुष्पा गोयल यांची) सून, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), जयपूर.

३ अ. प्रेमभाव : ‘मी जयपूरला आल्यानंतर (पूर्वी मी झारखंडला होते.) माझे मन येथे रमत आहे ना ? मला काही अडचण नाही ना ?’, अशी त्या वारंवार माझी चौकशी करतात.

३ आ. साधनेसाठी प्रोत्साहन देणे : माझी पू. आजींशी भेट होते, तेव्हा त्या मला साधना करण्यासाठी प्रोत्साहन देतात. त्या नेहमी म्हणतात, ‘‘गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) आहेत; म्हणूनच सर्वकाही आहे. आपल्याला चांगले प्रयत्न करून गुरुदेवांचे मन जिंकायचे आहे. त्यांच्या अनुसंधानात रहाण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपल्या जीवनाचे ध्येय साधनाच असले पाहिजे.’’

३ इ. कृतज्ञताभाव

१. पू. आजींमध्ये गुरुदेवांप्रती अखंड कृतज्ञताभाव असतो. ‘गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेनेच सर्वकाही होत आहे’, असा त्यांचा भाव असतो. आपले उठणे-बसणे, चालणे-फिरणे हे सगळे केवळ गुरुदेवांच्या कृपेनेच होत आहे. रात्री जाग आली, तर त्यांना वाटते, ‘आपल्याला गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेनेच जाग आली.’

२. आमच्या विवाहाच्या वेळी पू. आजी रामनाथी आश्रमात आल्या होत्या. त्या वेळी साधकांचा सेवाभाव पाहून त्यांना अत्यंत कृतज्ञता वाटत होती. जयपूरला परतल्यानंतरही ‘आपल्यासाठी साधकांनी किती केले’, हे आठवले की, त्या त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतात.

३ ई. पू. आजींच्या जवळपास कितीतरी दैवी कण दिसतात.

४. पू. खेमकाआजींमध्ये जाणवलेला पालट

पू. आजींचे तळहात आणि तळपाय यांना स्पर्श केल्यास ते पुष्कळच मऊ अन् गुलाबी झाले आहेत. अगदी नवीन जन्मलेल्या बाळासारखे (२ – ३ मासांच्या बाळाच्या तळव्यांसारखे) मऊ झाले आहेत.’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : २४.७.२०२२)

– सौ. मधुलिका आकाश गोयल , जयपूर, (२४.७.२०२२)