(म्हणे) ‘आम्ही तसे (वन्दे मातरम्) म्हटले नाही, तर आम्हाला कारागृहात टाकणार का ?’

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना पोटशूळ

सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ‘हॅलो’ऐवजी ‘वन्दे मातरम्’ म्हणण्याचा आदेश दिल्याचे प्रकरण

मुंबई – भारतीय राज्यघटनेने दिलेल्या स्वातंत्र्याचा गळा आवळू नका. कुणी काय खावे ? काय घालावे ? काय बोलावे ? हे तुम्ही ठरवणार का ? आम्ही तसे (वन्दे मातरम्) म्हटले नाही, तर आम्हाला कारागृहात टाकणार का ? असा प्रश्‍न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रीपदाचा पदभार स्वीकारताच राज्यातील सर्व सरकारी कार्यालयांतील अधिकारी आणि कर्मचारी यांना भ्रमणभाषवरून संवाद साधतांना ‘हॅलो’ऐवजी ‘वन्दे मातरम्’ म्हणावे’, असा आदेश दिला होता. त्याला उद्देशून आव्हाड यांनी वरील प्रतिक्रिया दिली.

(म्हणे) ‘मी ‘वन्दे मातरम्’ नव्हे, तर ‘जय महाराष्ट्र’ म्हणीन !’

विरोधासाठी विरोध करणारे असे नेते राष्ट्रहित काय साधणार ?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ

‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भ्रमणभाष केल्यावर ते ‘जय महाराष्ट्र’ म्हणतात. त्यामुळे मी ‘वन्दे मातरम्’ न म्हणता ‘जय महाराष्ट्र’ म्हणीन. कायद्याने अशी बंधने घालणे योग्य नाही. लोकांच्या आवडी-निवडीनुसार ते बोलतात’, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केले.

इंग्रजांच्या स्मृती पुसून टाकायला हव्यात ! – मंत्री मुनगंटीवार

‘हॅलो’ हा शब्द १८ व्या शतकात आला होता. त्याचा अर्थ ‘आश्‍चर्य व्यक्त करणे’ असा होतो. इंग्रजांच्या स्मृती पुसून टाकायला हव्यात. आपल्या मराठीच्या पुस्तकात ‘वन्दे मातरम्’चे चांगल्या प्रकारे वर्णन करण्यात आले आहे. ‘राष्ट्रभक्ताच्या ओठांतून निघालेले ‘वन्दे मातरम्’ प्राणप्रिय आहे’, असे मंत्री मुनगंटीवार म्हणाले.

योग्य अर्थ काढण्याची क्षमता आपण विकसित करू न शकणे, हा शिक्षणपद्धतीचा दोष ! – सुधीर मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार

‘वन्दे मातरम्’ला अनेकांकडून विरोध होऊ लागल्यावर सांस्कृतिक कार्यमंत्री मुनगंटीवार म्हणाले, ‘‘जे विरोध करतील, त्यांच्याशी आम्ही संवाद साधू. त्यांना समजावण्याचा प्रयत्न करू. हा काही जातीय किंवा धर्मांध शब्द नाही. मी महाराष्ट्राचा सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात हे अभियान चालवायचे आहे. त्यामुळे ‘कुणालाही आम्ही कारागृहात टाकू’, असे म्हटलेले नाही. हा आपल्या शिक्षणपद्धतीचा दोष आहे की, योग्य अर्थ काढण्याची क्षमता आपण विकसित करू शकलेलो नाही. ‘हॅलो’ या शब्दाला पर्यायी शब्द म्हणून ‘वन्दे मातरम्’ वापरावे, इतकेच मी म्हटले आहे.’’

भारताला ७५ वर्षे झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर आमच्या मंत्र्यांनी केलेली घोषणा योग्य ! – रावसाहेब दानवे, रेल्वे राज्यमंत्री

रावसाहेब दानवे, रेल्वे राज्यमंत्री

‘वन्दे मातरम्’ म्हणणे चुकीचे नाही. ज्या व्यक्तीला देशाप्रती स्वाभिमान आहे, तिने ‘वन्दे मातरम्’ म्हटले पाहिजे. सरकारने असा कुठलाही नियम केलेला नाही. ज्यांना कुणाला ‘वन्दे मातरम्’ म्हणणे आवडते, त्यांनी ते म्हणावे. ज्यांना विरोध करायचा आहे, त्यांनी विरोध करावा. भारताला ७५ वर्षे झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर आमच्या मंत्र्यांनी केलेली ही घोषणा योग्य आहे.

‘वन्दे मातरम्’पेक्षा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ‘जय बळीराजा’ म्हणावे ! – नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

‘वन्दे मातरम्’ हा आमचा स्वाभिमान आहे, तर ‘बळीराजा’ हा जगाचा पोशिंदा आहे. बळीराजाचा सन्मान करण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ‘जय बळीराजा’ म्हणावे.

संपादकीय भूमिका

  • ज्या क्रांतीकारकांनी ‘वन्दे मातरम्’चा उद्घोष करत भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले, त्याच भारतात राहून ‘वन्दे मातरम्’ म्हणणार नाही’, असा उद्दामपणा करणार्‍यांना भारतात रहाण्याचा अधिकार आहे का ?
  • ‘वन्दे मातरम्’ला विरोध करणारे ‘राष्ट्रवादी’ कसे ?