ध्वनीप्रदूषणामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर विपरीत परिणाम होतो !  

  • स्पेनमधील संशोधकांचा निष्कर्ष !

  • अधिक रहदारीमुळे स्मरणशक्ती क्षीण होते !

प्रतीकात्मक छायाचित्र

बार्सिलोना (स्पेन) – ‘इन्स्टिट्यूट फॉर ग्लोबल हेल्थ’च्या संशोधकांनी बार्सिलोनामधील ३८ शाळांमध्ये शिकणार्‍या मुलांवर संशोधन केल्यावर शाळेत जातांना शालेय मार्गावर अधिक रहदारी असल्याने मुलांची स्मरणशक्ती कमकुवत होते, तसेच ध्वनीप्रदूषणामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर विपरीत परिणाम होतो, असे आढळून आले.

१. या संशोधनात ७ ते १० वर्षे वयोगटातील २ सहस्र ६८० मुलांमध्ये असे आढळून आले की, मोठ्या आवाजाच्या पातळीत ५ डेसिबल वाढ हीसुद्धा स्मरणशक्ती ११.५ टक्क्यांनी न्यून करते. त्याच वेळी कठीण कार्ये करण्याच्या क्षमतेच्या विकासावरही २३.५ टक्के प्रभाव पडतो. यामुळे अभ्यासावरील लक्ष ४.८ टक्के अल्प होते.

२. संशोधकांना घराबाहेरील आणि घरातील आवाजाची तुलना करतांना आढळले की, गोंगाटयुक्त क्रीडांगण असलेल्या शाळांमधील मुलांना परीक्षेमध्ये अल्प गुण मिळाल्याचे दिसून आले आहे.

३. ‘अभ्यासाचा निष्कर्ष असे सूचित करतो की, घरातील आवाज सरासरी डेसिबल पातळीपेक्षा अधिक असल्यास त्याचा मज्जासंस्थेच्या विकासावर विपरीत परिणाम होतो’, असे अभ्यासक डॉ. मारिया फॉस्टर यांनी सांगितले.

४. ‘युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट फॉर प्रायमरी केअर रिसर्च जॉर्डी गोल’च्या संशोधकांना असे आढळून आले की, वायूप्रदूषण, ध्वनीप्रदूषण आणि रहदारी असलेल्या भागांत रहाणार्‍या मुलांमध्ये लठ्ठपणाची शक्यता अधिक असते.

अल्प आवाज आणि रहदारी असणार्‍या ठिकाणी शाळा उभाराव्यात !

या संशोधनाचे लेखक जॉर्डी सॅनियर यांनी सांगितले की, आमचे संशोधन ‘बालपण हा असुरक्षित काळ आहे’ या सिद्धांताचे समर्थन करते. ध्वनीप्रदूषणामुळे पौगंडावस्थेपूर्वी होणार्‍या स्मरणशक्तीच्या विकासाची प्रक्रिया मंदावते. भविष्यात हे लक्षात घ्या की, ज्या ठिकाणी अल्प आवाज आणि रहदारी असेल अशा ठिकाणी शाळा बनवाव्यात.