इम्रान खान यांनी पुन्हा केले भारताच्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणाचे कौतुक !

लाहोर येथील सभेमध्ये दाखवला परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांचा अमेरिकेला खडे बोलत सुनावतांनाचा व्हिडिओ !

लाहोर (पाकिस्तान) – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी लाहोर येथील एका सभेमध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री एस्. जयशंकर यांचा व्हिडिओ दाखवून भारताच्या परराष्ट्र धोरणाचे पुन्हा एकदा कौतुक केले. इम्रान खान म्हणाले, ‘‘रशियाकडून स्वस्त तेल खरेदी केल्यामुळे अमेरिकेकडून सतत दबाव असतांनाही जयशंकर त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिले. हे कौतुकास्पद आहे.’’ एस्. जयशंकर यांनी युरोपमधील स्लोव्हाकिया देशाच्या ब्रातिस्लाव्हा येथे आयोजित एका कार्यक्रमात रशियाकडून तेल विकत घेण्यावरून अमेरिकेला खडे बोल सुनावले होते. जयशंकर म्हणाले होते, ‘‘जर युरोप रशियाकडून गॅस विकत घेऊ शकतो, तर भारत रशियाकडून तेल का विकत घेऊ शकत नाही ?’’

सभेमध्ये बोलतांना इम्रान खान म्हणाले की, भारताने रशियाकडून तेल खरेदी केले; कारण हा त्यांच्या लोकांच्या हिताचा निर्णय होता. पाकिस्तानसमवेत स्वातंत्र्य मिळालेला भारत कठोर भूमिका घेऊन त्याच्या जनतेच्या गरजेनुसार परराष्ट्र धोरण बनवू शकत असेल, तर पाकिस्तान सरकार का बनवू शकत नाही ?