‘३०.११.२०२१ या दिवशी आम्ही (मी (कु. श्रिया अनिरुद्ध राजंदेकर (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय १० वर्षे), आई (सौ. मानसी राजंदेकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), बाबा (श्री. अनिरुद्ध राजंदेकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के) आणि लहान भाऊ पू. वामन (वय ३ वर्षे)) सायंकाळी ६.३० वाजता मिरज आश्रमात पोचलो. आम्ही तिथे एक रात्र निवासासाठी थांबलो होतो. त्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने मला आलेल्या अनुभूती मी कृज्ञतापूर्वक श्री गुरुचरणी अर्पण करत आहे.
१. मिरज आश्रमात जातांना प्रवासात आलेल्या अनुभूती
१ अ. मिरज आश्रमापासून दूर असतांना ‘सूक्ष्मातून पुष्कळ मोठे युद्ध चालू आहे’, असे जाणवणे : आमची गाडी मिरज आश्रमापासून दूर असतांना मला पुष्कळ मळमळत होते. तेव्हा मला ‘सूक्ष्मातून पुष्कळ मोठे युद्ध चालू आहे’, असे जाणवत होते. मी गाडीत नामजप करत झोपून राहिले होते. नामजप करतांनाही वाईट शक्ती पुष्कळ अडथळे आणत होत्या; म्हणून मी सतत प्रार्थना करत नामजप करत होते.
१ आ. मिरज आश्रमाच्या जवळ पोचल्यावर ‘परात्पर गुरु डॉ. आठवले समवेत असून त्यांनी सर्व त्रास आणि नामजपात येणारे अडथळे दूर केले आहेत’, असे जाणवणे : मिरज आश्रम जवळ येऊ लागला, तसा मला वातावरणात पालट जाणवायला लागला. मला होणारा त्रास हळूहळू न्यून व्हायला लागला. मला सहजतेने श्वास घेता येऊ लागला आणि माझा नामजप आपोआप अन् एका लयीत व्हायला लागला. तेव्हा ‘मी रामनाथी आश्रमातच चालले आहे’, असे मला जाणवले. मिरज आश्रमात पोचल्यावर मला होत असलेले त्रास आणि नामजपातील अडथळे प.पू. गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) सूक्ष्मातून दूर केले असून ‘तेच माझ्या समवेत मिरज आश्रमात येत आहेत’, असे मला जाणवत होते.
२. मिरज आश्रमात पोचल्यावर तेथील चैतन्य पुष्कळ वाढले असून आश्रमात तिन्ही गुरूंचे अस्तित्व जाणवणे
आम्ही मिरज आश्रमात पोचल्यावर मला मोगर्याचा सुगंध आला. ‘मिरज आश्रमातील चैतन्य पुष्कळ वाढले आहे’, असे मला जाणवले. मला आश्रमात तिन्ही गुरूंचे (परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे) अस्तित्व जाणवले. मला संपूर्ण आश्रमात प्रीती, भाव, चैतन्य आणि शांती यांची स्पंदने अन् लहरी जाणवत होत्या.
३. पू. जयराम जोशीआबा यांच्या खोलीत आलेल्या अनुभूती
३ अ. पू. जयराम जोशी यांच्या खोलीत गेल्यावर ‘मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याच खोलीत गेले असून पू. जोशीआबांकडून आनंद आणि प्रीती यांची स्पंदने येत आहेत’, असे जाणवणे : पू. जयराम जोशीआबांना भेटायला आम्ही त्यांच्या खोलीत गेल्यावर ‘मी परात्पर गुरुदेवांच्याच खोलीत गेले आहे’, असे मला जाणवले. त्यांच्या खोलीत गेल्यावर मला चंदनाचा सुगंध आला. ‘पू. आबांकडून आनंद आणि प्रीती यांची स्पंदने येत आहेत’, असे मला जाणवले. मला त्यांच्या ठिकाणी प.पू. गुरुदेवांचेच दर्शन होऊन माझा भाव जागृत होत होता.
३ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राकडे बघितल्यावर ‘ते सजीव आणि बोलके झाल्याचे जाणवून ‘प.पू. डॉक्टर’ हा नामजप आपोआप चालू होणे : पू. आबांच्या खोलीतील प.पू. गुरुदेवांच्या छायाचित्राकडे बघितल्यावर ‘ते सजीव झाले आहे’, असे मला जाणवले.
पू. आबा आमच्याशी बोलत असतांना ‘प.पू. गुरुदेव आमचे सर्व बोलणे ऐकत आहेत आणि तेही आमच्याशी बोलत आहेत’, असे मला जाणवत होते. त्या छायाचित्राकडे बघितल्यावर माझा ‘प.पू. डॉक्टर’, ‘प.पू. डॉक्टर’, असा नामजप आपोआप चालू झाला. तेव्हा मला आतून पुष्कळ आनंद जाणवत होता.
४. परात्पर गुरु डॉ. आठवले पूर्वी मिरज आश्रमात रहात असलेल्या खोलीमध्ये आलेल्या अनुभूती
४ अ. खोलीत गेल्यावर ‘मी वैकुंठातच आले आहे’, असे मला वाटत होते.
४ आ. मी खोलीत असेपर्यंत मला चंदनाचा सुगंध येत होता.
४ इ. खोलीतील लाद्यांचा स्पर्श ढगांप्रमाणे जाणवून ‘मी अधांतरी उभी आहे’, असे मला वाटत होते.
४ ई. खोलीत श्रीलक्ष्मीचे अस्तित्व जाणवणे : खोलीत ठेवलेल्या बाकाकडे पाहिल्यावर मला तिथे श्रीलक्ष्मीचे अस्तित्व जाणवले. तिथे ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ बसल्या आहेत’, असे मला जाणवले.
४ उ. खोलीत श्रीलक्ष्मीतत्त्व आणि श्रीविष्णुतत्त्व जाणवणे : त्या खोलीतील पलंगाकडे बघितल्यावर मला ‘त्या ठिकाणी प्रत्यक्ष शेषशय्येवर भगवान श्रीविष्णु, म्हणजे प.पू. गुरुदेव तिथे झोपले आहेत’, असे जाणवले. त्या खोलीत मला ‘श्रीलक्ष्मी आणि श्रीविष्णु अशी दोन्ही तत्त्वे आहेत’, असे जाणवले. मी त्या खोलीत उभी असूनही माझे ध्यान लागत होते. मला खोलीत शक्ती आणि आनंद यांची स्पंदने जाणवत होती.
४ ऊ. ‘श्रीकृष्णाचे चित्र सजीव झाले असून ते निर्गुणाकडे जात आहे’, असे जाणवणे : तिथे ठेवलेले ‘श्रीकृष्णाचे चित्र सजीव झाले असून ते निर्गुणाकडे जात आहे’, असे मला जाणवले. त्यातून पुष्कळ प्रमाणात मारक तत्त्व प्रक्षेपित होत होते.
४ ए. खोलीतील कपाटाकडे बघितल्यावर ‘प.पू. गुरुदेवांनी सर्व साधकांना देण्यासाठी कपाटात भाव, भक्ती आणि चैतन्य ठेवले आहे’, असे मला वाटले.
५. मिरज आश्रमातील ध्यानमंदिरात जाणवलेला पालट !
५ अ. प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र सजीव झाल्याने ‘त्याच्याकडे कुठूनही पाहिले, तरी ते आपल्याकडेच पहात आहेत’, असे जाणवणे : ध्यानमंदिरातील प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राकडे बघितल्यावर ‘प.पू. बाबांचे (प.पू. भक्तराज महाराज यांचे) छायाचित्र सजीव झाले असून आपण ज्या दिशेने जातो, त्या दिशेने ते आपल्याकडे बघत आहेत’, असे मला जाणवले. त्यांचा तोंडवळा पुष्कळच हसरा दिसत होता.
५ आ. परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्राकडे बघितल्यावर ‘तेथे प्रत्यक्ष परात्पर गुरु डॉक्टर उपस्थित असून ते सर्व साधकांकडे बघत आहेत’, असे मला जाणवले.
वरील सर्व सूत्रे मला केवळ प.पू. गुरुदेवांच्या कृपेनेच अनुभवता आली. यासाठी मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– कु. श्रिया राजंदेकर, (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), फोंडा, गोवा. (३०.११.२०२१)
|