नाशिक – देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत आहेत; मात्र अजूनही राज्यातील बर्याचशा गावांत सुविधा पोचलेल्या नाहीत. जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हेदपाडा गावातील गर्भवती स्त्रीला रुग्णालयात नेण्यासाठी चांगला रस्ता नसल्याने तिला झोळीद्वारे चिखलवाटेतून ३ कि.मी.चा प्रवास करून शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. ही घटना १२ ऑगस्ट या दिवशी घडली. अंबोली येथील शासकीय रुग्णालयात महिलेने कन्येला जन्म दिला.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तोरंगण गावाजवळ मेटकावरा आणि हेदपाडा ही २ गावे आहेत. ३०० लोकवस्ती असलेल्या हेदपाडा गावातील लोकांना प्रतिवर्षी पावसाळ्यात रस्त्याची समस्या भेडसावते. या गावात जाण्यासाठी डांबरी रस्ता संमत असतांनाही नेहमी डांबरीकरणाऐवजी मातीचा रस्ता सिद्ध केला जातो. त्यामुळे पावसाळ्यात हा रस्ता चिखलमय होत असल्याने दुचाकी नेणेही अवघड होते. एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असतांना अजूनही जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यांपर्यंत विकास पोचलेला नाही.
हेदपाडा गावात डांबरीकरणाच्या रस्त्याला संमती मिळाली असतांनाही मातीचा रस्ता करणे, हे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांना लज्जास्पद आहे. या प्रकरणी डांबरीकरणाचा रस्ता करण्यात आडकाठी करणारे लोकप्रतिनिधी आणि संबंधित दोषी अधिकारी यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अशी जनतेची मागणी आहे. |
संपादकीय भूमिकास्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर मूलभूत सुविधांची वानवा ! |