डॉक्टरांना मारहाण ?

‘डॉक्टर-रुग्ण’ यांचा संबंध हा अलीकडच्या २० वर्षांत पुष्कळ नाजूक आणि क्लिष्ट विषय झाला आहे. रुग्णालयात एखाद्या रुग्णाचा मृत्यू होतो किंवा एखादी दुर्घटना घडते. त्यासाठी डॉक्टरांना उत्तरदायी धरून त्यांना मारहाण आणि रुग्णालयांतील साहित्यांची मोडतोड करणे, अशा घटनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. नाशिक आणि संभाजीनगर येथे नुकत्याच अशा काही घटना घडल्या. त्यामुळे संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयाने रुग्णांना भेटणार्‍या नातेवाइकांच्या संख्येवर बंधने आणत भेटीची वेळ बंद केली आहे.

एकेकाळी ‘डॉक्टर म्हणजे देव’, अशी समाजामध्ये असलेली भावना नष्ट होत चालली आहे. हे असे का होत आहे ? याचा विचार सर्वांनीच करायला हवा. जेव्हा रुग्ण रुग्णालयात जातो किंवा भरती होतो, त्या वेळी ‘त्याला आणि त्याच्या नातेवाइकांना तो लवकरात लवकर बरा व्हावा’, असेच वाटते. तो बरा झाला नाही किंवा त्याची प्रकृती चिंताजनक झाली की, नातेवाइकांचा ताण वाढत जातो आणि त्याची परिणती हाणामारीमध्ये होते. यामध्ये ‘रुग्णाचा मृत्यू’ हा प्रसंग तर अजूनच संवेदनशील होतो; कारण मृत्यू झाला की, त्यामध्ये कुणी काही पालट करू शकत नाही. त्यामुळे या समस्येकडे डॉक्टर, रुग्ण आणि रुग्णाचे नातेवाइक सर्वांनीच संवेदनशीलतेने पहायला हवे. काही वेळा डॉक्टर किंवा रुग्ण यांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा आजार बळावतो आणि त्याचा मृत्यू होतो. यामध्ये ‘त्या परिस्थितीत कोण योग्य ?’, हे ठरवणे अतिशय अवघड आहे. प्रत्येक जण ‘मी बरोबर आणि दुसर्‍याची चूक आहे’, असाच विचार करतो. यामध्ये ज्याच्यामध्ये संयम आणि विवेक अल्प आहे अन् साधनेचा भाग नाही, अशा व्यक्ती समस्येला सामोरे जातांना अविवेकाने वागतात.

‘जन्म, मृत्यू आणि विवाह हे प्रारब्धानुसारच होतात’, या आध्यात्मिक दृष्टीकोनातून या घटनांकडे पहायला हवे. त्यामध्ये कुणी काही पालट करू शकत नाही, असे अध्यात्मशास्त्र सांगते. समाजाला धर्मशिक्षण न दिल्यामुळे हा भाग सर्वांना ठाऊक नाही. अर्थात् असे असले, तरी मनुष्यनिर्मित चुका या टाळल्याच पाहिजेत. चुकांचा अभ्यास होणे, ज्याची चूक असेल, त्याला त्याची जाणीव करून देणे, प्रसंगी त्यावर कठोर कारवाई करणे, हेही आवश्यक आहे. त्यामुळे समस्येचे उत्तर ‘हाणामारी’ हे नसून ‘उपाययोजना’ या दृष्टीने पाहिल्यास ‘डॉक्टर म्हणजे देव’, हे समीकरण पुन्हा समाजात नक्की निर्माण होईल !

– श्री. सचिन कौलकर, मुंंबई