माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना मानवी हक्क आयोगाची नोटीस !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे कार्यकर्ते अनंत करमुसे यांना मारहाण केल्याचे प्रकरण

अनंत कारमुसे यांना मारहाण झाल्यानंतरचे छायाचित्र

ठाणे, १२ ऑगस्ट (वार्ता.) – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे कार्यकर्ते अनंत करमुसे यांना ३ पोलिसांनी माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर नेले होते. तेथे त्यांना समाजिक माध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केल्याच्या कारणावरून आव्हाड यांच्या उपस्थितीत १५ हून अधिक जणांनी लाठी, लाथा, बुक्के यांनी मारहाण केल्याचा आरोप करत कारमुसे यांनी वर्तकनगर पोलीस ठाणे येथे केलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला होता. आता या प्रकरणी मानवी हक्क आयोगाने जितेंद्र आव्हाड यांना नोटीस बजावली आहे. या नोटिशीनुसार येत्या ९ सप्टेंबरपर्यंत आव्हाड यांना त्यांचे म्हणणे मांडण्यास सांगण्यात आले आहे.

या प्रकरणात १४ ऑक्टोबर २०२१ या दिवशी ठाणे येथील वर्तकनगर पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांना अटक केली होती. अटकेविषयी पोलिसांनी गोपनीयता बाळगली होती; मात्र भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ट्वीट करून ही घटना उघडकीस आणली. आव्हाड यांची या प्रकरणामध्ये १० सहस्र रुपयांच्या जामिनावर सुटका करण्यात आली होती, तर मुंबई सुरक्षा दलातील ३ पोलीस कर्मचार्‍यांसह १० ते १२ आरोपींना अटक झाली होती.

आता याच मारहाण प्रकरणात राज्य मानवी हक्क आयोगाने आव्हाड यांच्यासह मारहाण केल्याचा आरोप असलेल्या ३ पोलीस कर्मचार्‍यांना नोटीस बजावली आहे. कलम १६ नुसार त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी आयोगाने दिली असून ९ सप्टेंबरपर्यंत उत्तर देण्यास बजावले आहे.
या संदर्भात आव्हाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा संपर्क झाला नाही.

दोषी असलेल्यांवर आणि पोलिसांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे ! – अनंत करमुसे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

जर माझ्यावर पोलिसांना कारवाई करायची होती, तर पोलिसांनी मला पोलीस ठाण्यामध्ये न्यायला हवे होते; मात्र पोलिसांनी तसे न करता मला थेट आव्हाड यांच्या बंगल्यावर नेले. त्यामुळे दोषी असलेल्यांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे. विलंबाने का होईना मला दीड वर्षानंतर न्याय मिळत आहे. माझा न्यायप्रक्रियेवर पूर्ण विश्वास असून त्यानुसार दोषींवर कारवाई होईल.