तुळजापूर येथे ‘स्वराज्य संघटने’चे चिन्ह आणि ध्वज यांचे अनावरण

राज्यातील गडांचे संवर्धन करणे, हे संघटनेचे उद्दिष्ट ! – छत्रपती संभाजीराजे

तुळजापूर (जिल्हा धाराशिव) – येत्या वर्षभरात संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. राज्यातील प्रत्येक दुर्गम भागात जाणार असून ‘राज्यातील ५० गड पूर्वीच्या रूपात यायला हवेत’, हे माझे स्वप्न आहे. गडांचे संवर्धन करणे हेही ‘स्वराज्य संघटने’चे उद्दिष्ट आहे, असे वक्तव्य राज्यसभेचे माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केले. छत्रपती संभाजीराजे यांनी त्यांचे सुपुत्र युवराज शहाजीराजे यांच्या उपस्थितीत ९ ऑगस्ट या दिवशी ‘स्वराज्य संघटने’च्या चिन्हाचे अनावरण केले, त्या वेळी ते बोलत होते. संभाजीराजेंनी ‘स्वराज्य संघटने’ची अधिकृत घोषणा करण्यासाठी जाहीर सभेचे आयोजन केले होते.

या वेळी संभाजीराजे म्हणाले, ‘‘स्वराज्य संघटना राजकारणात जाणार नाही; मात्र वेळप्रसंगी आम्हाला तो मार्ग मोकळा आहे. सर्वसामान्य लोकांना ताकद देण्यासाठी स्वराज्य संघटनेची स्थापना करण्यात आली आहे.’’

संपादकीय भूमिका 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवापर्यंतही छत्रपतींच्या स्वराज्याचे गड-दुर्ग उपेक्षित असणे हे लज्जास्पद !