पुणे येथील धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस; नागरिकांना नदीपात्रात न उतरण्याचे आवाहन !

पुणे – येथील पानशेत धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे १०० टक्के भरल्याने पानशेत धरणाच्या सांडव्यावरून नदीपात्रामध्ये चालू असणारा विसर्ग सकाळी ९.३० वाजता १२ सहस्र ९३६ क्यूसेक्स करण्यात येत आहे, तसेच खडकवासला धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये झपाट्याने होत असलेली वाढ आणि पाणलोट क्षेत्रामधील अतीपर्जन्यमानामुळे खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये साधारण १ सहस्र ७१२ क्युसेक्स विसर्ग सोडण्यात येणार आहे, तर मुळशी धरणाची जलाशय पातळी ६०५.७० मी. वर पोचली असून संबंधित जलाशय साठा ५०६.५२ द.ल.घ.मी. आहे. धरण जलाशय ८८.७४ टक्के क्षमतेने भरले आहे. धरण पाणलोट परिसरात मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान होत असून गेल्या २४ घंट्यांत दावडी पर्जन्यमापक केंद्रात ३०४ मी.मी. पावसाची नोंद झालेली आहे; तसेच गेल्या २४ घंट्यात एकूण ४९.४९ द.ल.घ.मी. आवकाची नोंद झालेली आहे.

त्यामुळे नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलवण्यात यावीत, असे आवाहन खडकवासला, पानशेत आणि वरसगाव प्रकल्पाचे साहाय्यक अभियंता यो.स. भंडलकर यांनी केले आहे.