अकोला – महावितरण आस्थापनाने वीजचोरी करणार्यांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यानुसार महावितरणच्या भरारी पथकांनी एप्रिल ते जून-२०२२ या ३ मासांच्या काळात वीजचोरीची तब्बल १३१ कोटी ५० लाख रुपयांची २ सहस्र ६२५ प्रकरणे उघडकीस आणली आहेत. महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी १० ऑगस्ट या दिवशी सुरक्षा अन् अंमलबजावणी विभागाची आढावा बैठक घेतली.
सध्या महावितरणच्या सुरक्षा आणि अंमलबजावणी विभागात ६३ भरारी पथकांसह ८ अंमलबजावणी युनिट कार्यरत आहेत. या भरारी पथकांनी चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल, मे आणि जून या कालावधीत वीजचोरीची २३९.५८ दशलक्ष युनिटच्या वीजचोरीची तब्बल २ सहस्र ६२५ प्रकरणे उघडकीस आणून वीजचोरांकडून अनुमाने ५४ कोटी १६ लाख ६६ सहस्र रुपयांचा दंड वसूल केला आहे. उर्वरित देयकांची रक्कमही संबंधितांकडून लवकर वसूल करण्यात यावी, असेही निर्देश विजय सिंघल यांनी दिले आहेत.
संपादकीय भूमिकाविजेची चोरी करणार्यांकडून नुसता दंड वसूल न करता दंडासह त्यांच्यावर फौजदारी कारवाई करून त्यांना कारावासाची शिक्षाही केली पाहिजे, तरच असे वीज चोरीचे प्रकार थांबतील ! |