‘सनातनच्या रामनाथी आश्रमातील लागवडीत सेवा करणारे साधक श्री. रामचंद्र (दादा) कुंभार यांच्याशी माझा अधिक संपर्क येत नाही. आश्रमात वावरतांना येता-जाता त्यांच्याशी ३ – ४ वेळा संपर्क आल्यावर मला त्यांच्या संदर्भात पुढील गुणवैशिष्ट्ये जाणवली.
१. संत सावता माळी यांच्याप्रमाणे विष्णुस्वरूप परात्पर गुरुमाऊलीप्रती निस्सीम शरणागतभाव असणे
श्री. दादा कुंभार यांच्यामध्ये परात्पर गुरुमाऊलींप्रती निस्सीम शरणागतभाव जाणवतो. त्यामुळे ज्याप्रमाणे दासमारुति प्रभु श्रीरामाच्या पुढे दोन्ही हात जोडून दास्यभावात उभा असतो, त्याप्रमाणे श्री. दादांचे सूक्ष्म रूप परात्पर गुरुमाऊलीच्या पुढे दोन्ही हात जोडून शरणागतभावाने उभे असते’, असे मला जाणवले.
२. मन पुष्कळ निरागस असल्यामुळे त्यांच्या मनात भगवंताविषयीचा ‘भोळाभाव’ जाणवणे
त्यांचे मन पुष्कळ निरागस असल्यामुळे त्यांच्या मनात भगवंताविषयीचा ‘भोळाभाव’ पुष्कळ प्रमाणात आहे. त्यामुळे त्यांच्या मुखावरही लहान बालकाप्रमाणे निरागस भाव जाणवतो. ‘ते दिवसभर अखंड भावावस्थेत आहेत’, असे जाणवते.
३. श्री. दादा कुंभार यांना लागवडीतील लता, रोपे आणि वृक्ष यांचा सांभाळ करतांना त्यांच्यामध्ये देवता किंवा गुरु यांचे दर्शन होणे
ते लागवडीतील लता, रोपे आणि वृक्ष यांचा सांभाळ करतांना त्यांचे विष्णुस्वरूप गुरुमाऊलीशी अखंड अनुसंधान असते. त्यांच्या अंत:करणातील भावामुळे त्यांना लता, रोपे आणि वृक्ष यांच्यामध्ये कधी विठ्ठल, कधी श्रीराम, कधी श्रीकृष्ण, तर कधी परात्पर गुरु डॉ. आठवले किंवा प.पू. भक्तराज महाराज यांचे सूक्ष्मातून दर्शन होते. त्यामुळे ते अखंड भावावस्थेत राहून लागवडीत सेवा करतात.
४. श्री. दादा कुंभार यांच्या मनाची शुद्धता आणि निर्मळता यांमुळे त्यांच्याकडे ईश्वराचे निर्गुण स्तरावरील शुद्ध चैतन्य पुष्कळ प्रमाणात आकृष्ट होणे
श्री. दादा कुंभार यांच्या मनाची शुद्धता आणि निर्मळता यांमुळे त्यांच्याकडे ईश्वराचे निर्गुण स्तरावरील शुद्ध चैतन्य पुष्कळ प्रमाणात आकृष्ट होते. त्यामुळे त्यांच्या देहातील प्रत्येक पेशी पुष्कळ प्रमाणात शुद्ध आणि निर्मळ झालेली आहे. त्यांच्या हृदयात परात्पर गुरुमाऊलीप्रती भोळाभाव आहे आणि त्यांच्या देहात ईश्वराचे निर्गुण स्तरावरील चैतन्य कार्यरत झालेले आहे. त्यांच्यातील भाव आणि चैतन्य यांच्या संयुक्त लहरी पांढर्या रंगाच्या प्रकाशकिरणांच्या स्वरूपात वातावरणात प्रक्षेपित होतात. दादा कुंभार यांच्याकडून प्रक्षेपित होणार्या पांढर्या रंगाच्या किरणांमुळे लागवडीतील लता, वेली आणि वृक्ष पुष्कळ प्रमाणात चैतन्यदायी झाले आहेत.
५. श्री. दादा कुंभार यांचा अहं पुष्कळ अल्प असणे
श्री. दादांचा अहं पुष्कळ अल्प असल्यामुळे त्यांचा देह काही वेळा पारदर्शक दिसतो. त्याचप्रमाणे त्यांच्या मनामध्ये सतत भोळाभाव जागृत असल्यामुळे त्यांचे मन पूर्णपणे निर्मळ झालेले आहे. त्यामुळे त्यांच्या समोर संत किंवा परात्पर गुरु डॉ. आठवले स्थुलातून आले, तर संत आणि परात्पर गुरुदेव यांचे श्री. दादा कुंभार यांच्या ठिकाणी सूक्ष्मातून प्रतिबिंब पडलेले दिसते. यावरून त्यांच्यामध्ये ‘ईश्वराचे रूप आणि तत्त्व आरशाप्रमाणे परावर्तित करण्याची दैवी क्षमता आहे’, हे सूत्र मला शिकायला मिळाले. अशी अनुभूती मला पहिल्यांदाच अनुभवण्यास मिळाली.
६. आनंद आणि शांती यांची अनुभूती येणे
त्यांच्याकडे पाहिल्यावर काही वेळा आनंदाची आणि अधिक वेळ शांतीची अनुभूती येते.
७. निष्काम कर्मयोगानुसार साधना चालू असणे
ते निरपेक्षभावाने लागवडीत सेवा करतात आणि साधकांना साहाय्य करतात. त्यामुळे त्यांची ‘निष्काम कर्मयोगानुसार साधना चालू आहे’, असे जाणवते.
८. विविध गुणांनी परात्पर गुरुमाऊलीचे मन जिंकल्याचे जाणवणे
त्यांनी त्यांच्यातील ‘भोळाभाव, निस्सीम सेवाभाव, निर्मळता आणि निरपेक्षपणे कर्म करणे’ या गुणांमुळे परात्पर गुरुमाऊलीचे मन जिंकलेले आहे’, असे जाणवते.
९. श्री. दादांच्या सहवासात असतांना ‘संतांची प्रीती आणि आनंद अनुभवत आहे’, अशी साधिकेला अनुभूती येणे
श्री. दादा कुंभार यांच्या सहवासात असतांना संतांची प्रीती, चैतन्य आणि आनंद अनुभवल्याची अनुभूती येऊन त्यांच्या सहवासात असतांना मला पुष्कळ प्रमाणात आध्यात्मिक लाभ होतात. त्याचप्रमाणे माझ्या मनातील अनावश्यक आणि नकारात्मक विचारांचे प्रमाण अल्प होऊन माझे मन उत्साही, आनंदी आणि शांत होते.
कृतज्ञता
‘परात्पर गुरुमाऊली यांच्या कृपेमुळे श्री. दादा कुंभार यांच्या संदर्भात वरील आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये जाणवली’, यासाठी मी श्रीगुरुचरणी पुष्कळ कृतज्ञ आहे.’
– कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.२.२०२२)
|