११.८.२०२२ या दिवशी रक्षाबंधन आहे. त्या निमित्ताने…
१. वर्ष १९०५ मध्ये ब्रिटीश व्हाईसरॉय आणि गव्हर्नर जनरल कर्झन याने बंगालच्या फाळणीची घोषणा करणे अन् संपूर्ण देशात याचा प्रचंड विरोध होऊ लागणे
‘वर्ष १९०५ मध्ये ब्रिटीश व्हाईसरॉय आणि गव्हर्नर जनरल कर्झन याने बंगालच्या फाळणीची घोषणा केली होती. त्या काळी बंगालमध्ये आजचा बंगाल, बिहार, ओडिशा आणि बांगलादेश समाविष्ट होते. बंगालच्या फाळणीचा संपूर्ण देशात प्रचंड विरोध होऊ लागला.
२. गुरुदेव रविंद्रनाथ टागोरांनी बंधुभावाचा संदेश देण्यासाठी सनातन संस्कृतीच्या रक्षाबंधनाचा चतुराईने व्यावहारिक उपयोग करणे
‘जेव्हा लोकांमध्ये आंतरिक एकता आणि संघटनात्मक बळ असते, तेव्हा बाहेरचे शत्रू फूट पाडण्यात सक्षम होऊ शकत नाहीत’, या सनातन संस्कृतीच्या सिद्धांताला गुरुदेव रविंद्रनाथ टागोरांनी व्यावहारिक रूप दिले. बंधुभावाचा संदेश देण्यासाठी त्यांनी रक्षासूत्राचा (राखीचा) उपयोग केला.
३. राखीच्या नाजूक धाग्यामागे दडलेल्या शुभ संकल्पाने लोकांमध्ये परस्पर प्रेमभाव, एकता, बंधुभाव आणि संघटन बळ वाढणे अन् काही काळासाठी बंगालची फाळणी टळणे
१६.१०.१९०५ या दिवशी गंगेकाठी त्यांच्या नेतृत्वात एक मिरवणूक निघाली. टागोर कोलकात्याच्या मार्गांवर चालणार्या लोकांना रक्षासूत्र (राखी) बांधत होते. एवढेच नव्हे, तर त्यांनी मशिदीत जाऊन तेथील मौलवींनाही राखी बांधली. दिसायला तो राखीचा नाजूक धागा होता; परंतु त्यामागे दडलेल्या शुभ संकल्पाने चमत्कारिक काम केले. लोकांमध्ये परस्पर प्रेमभाव, एकता, बंधुभाव आणि संघटन बळ वाढले. परिणामी काही काळासाठी बंगालची फाळणी टळली.’
(साभार : मासिक ‘ऋषिप्रसाद’)
रक्षाबंधनाच्या दिवशी करायची प्रार्थना : बहिणीने भावाच्या कल्याणासाठी आणि भावाने बहिणीच्या रक्षणासाठी प्रार्थना करण्यासमवेतच दोघांनीही ‘राष्ट्र अन् धर्म यांच्या रक्षणासाठी आमच्याकडून प्रयत्न होऊ देत’, अशी ईश्वराला प्रार्थना करावी.