हव्यास का ?

कलियुगात ‘पैसा’ हेच सर्वस्व मानले जात आहे. त्यासाठी माणूस प्रसंगी एक नव्हे, तर दोन ठिकाणी कामे करत आहे. निवृत्त झाल्यावरही त्यातच व्यस्त रहात आहे. अरे, काय हे ? पैशामुळे जिवाला उतारवयातही आराम राहिलेला नाही. मानवाची ‘पैसा आणि चिंता’ यांच्याशी घट्ट मैत्री झाली आहे; कारण ज्यांच्याकडे तो नाही, त्यांना ‘तो आपल्याकडे कधी येणार ?’, असे वाटते, तर ज्यांच्याकडे तो आहे, त्यांना ‘त्यात अधिक भर कशी पडत राहील ? त्यात खंड तर पडणार नाही ना ?’, याची चिंता आहे.

कुटुंबाचे अथवा कुटुंबातील जे सदस्य नोकरी-व्यवसाय करतात त्यांचे मासिक उत्पन्नही चांगले आहे, तसेच आर्थिक बाजू भक्कम आहे, हे इतरांच्या लक्षात न यावे, यासाठी कायम बिकट आर्थिक परिस्थितीचे रडगाणे गाणारेही या समाजात आहेत. एकीकडे नवीन मालमत्ता, चैनीच्या वस्तू, दागिने आदी वस्तूंची खरेदी केली जाते. हे सर्व करतांना ‘आपण कुठेतरी थांबले पाहिजे’, याचा पुसटसा विचारही होत नाही. उलटपक्षी ‘हेही पाहिजे आणि तेही पाहिजे’, ही वृत्ती वाढत जाते. स्वार्थ इतका पराकोटीचा वाढतो की, यामध्ये ‘ज्या देवामुळे आपले अस्तित्व आहे, त्याचे स्मरण म्हणजेच नामस्मरण करावे’, असे वाटत नाही. पैशाने खरेदी करता येईल, असे सर्व आहे; पण देवाचे स्मरण करण्यासाठी वेळ नाही, असे कारण दिले जाते आणि ते देतांना वेळ कसा नाही ? याचा पाढाच वाचला जातो. स्वतःकडे गडगंज संपत्ती आहे; पण ‘ती कशी सतत वाढत राहील ? पुढच्या ७ पिढ्या आरामात कशा बसून खातील ?’, याचा वारंवार विचार केला जातो. या विचारांमुळेच आज माणूस हव्यास आणि भ्रष्टाचार यांकडे वळला आहे.

पैसा आणि त्यामुळे खरेदी करता येणार्‍या वस्तू या दृश्य स्वरूपात दिसतात. यासाठी पैशावर अपार विश्वास आहे. तो कमावण्यासाठी जिवाचे रान केले जाते. आयुष्यात काय कमावले ? तर पैसे ! प्रसंगी त्यासाठी दुसर्‍याच्या अधिकाराचेही हिसकावून घेतले जातात, ज्याने आपल्या पोटापाण्याची सोय केली त्याला डावलून पुढे जाणे, ही ‘सध्याची रितच आहे’, असे मानले गेले. एवढा खटाटोप करूनही ‘अंतिम समयी सर्व येथेच रहाते’, यावर विश्वासच नाही. जो देव हवा, पाणी, भूमी या गोष्टी विनामूल्य देतो, त्याच्या स्मरणाने जीवन आनंदीच होते. तिथे केवळ पैशाचा पाठलाग करणे, हा अविचारीपणा नव्हे का ?

– श्री. जयेश राणे, भांडुप, मुंबई.