खोबरे किंवा खोबरेल तेल विलक्षण आणि गुणकारी आहे. त्याचे लाभ काय ? भारतियांनी खोबरेल तेलाचा न्यून केलेला वापर भावी पिढीसाठी धोकादायक ठरू शकतो. या लेखात खोबरे आणि खोबरेल तेल यांचे महत्त्व जाणून घेऊया.
१. स्मृतीभ्रंशावर (‘अल्झायमर्स डिसिज’वर) रामबाण उपाय ठरलेले खोबरेल तेल !
गेली ३० वर्षे नारळाच्या खोबर्याला किंवा खोबरेल तेलाला आरोग्यबाधक ठरवल्यावर आता त्याचे ग्रह पालटले आहेत. दिवसागणिक वाढत असलेल्या ‘अल्झायमर्स’ या रोगावर रामबाण उपाय म्हणून खोबरेल तेलाला आता महत्त्व आले आहे.
अमेरिकेत आधुनिक वैद्य ‘रुग्णांना ‘टोस्ट’वर खोबरेल तेल लावून खा’, असे सांगत आहेत. इतके दिवस आजूबाजूचा काहीही गंध नसलेली ‘अल्झायमर्स’ने पीडित जनता एक मासाच्या ‘टोस्ट’वरच्या खोबरेल तेलाने एकेकाळचे परिचित जग परत नव्याने ओळखायला लागलेली आहे. ‘कोकोनट ऑईल’चे भाग्य डॉ. ब्रूस फाइफ यांनी पालटले.
२. पॉल सोएर्स नामक व्यक्तीकडून खोबरेल तेलाची ‘मिरॅकल ऑईल’ (चमत्कारी तेल) म्हणून विक्री
अमेरिकेच्या र्होड या बेटराज्यात रहाणार्या डॉ. ब्रूस फाइफ या आहारतज्ञाच्या घराशेजारी पॉल सोएर्स नावाचा माणूस होता. पॉल हा ‘मिरॅकल ऑईल’ विकायचा. आजूबाजूची जनता काहीही झाले की, त्याच्या दुकानात धावत यायची आणि तेल घेऊन जायची.
ब्रूसने कुतूहल म्हणून एके दिवशी पॉलला याविषयी विचारणा केली. पॉल म्हणाला, ‘‘थायलंड किंवा फिलिपाइन्स या देशातून नारळ आणतो. नारळाच्या डोळ्यात खिळा घालून पाणी काढतो, मग तो हातोड्याने फोडतो. आतले खोबरे किसतो, ते पाण्यात उकळत ठेवतो. पाणी आटून वर रहाते, ते ‘कोकोनट ऑईल (खोबरेल तेल)’ ! कसल्याही व्याधीवर उपचार म्हणून हेच देतो.’’
३. खोबरेल तेलाच्या ‘मिरॅकल’चा डॉ. ब्रूस यांनी घेतलेला अनुभव
डॉ. ब्रूस आहारतज्ञ असल्यामुळे त्यांना प्रक्रिया न झालेल्या नैसर्गिक खाद्यपदार्थांमध्ये रस होता. खोबर्यातून तेल काढण्याची किचकट प्रक्रिया सोपी करायला ब्रूस यांनी पुष्कळ साहाय्य केले. पॉलला खोबरे वाटायला ‘मिक्सर’ आणून दिला. खोबर्यातून तेल काढायला द्राक्षातून ‘वाइन’ काढायचे यंत्र आणून दिले. मग तेल काढणे पुष्कळ सोपे झाले. पॉलच्या सांगण्यावरून काहीही दुखत असले की, ब्रूसने चमचाभर ‘कोकोनट ऑईल’ तोंडाने घ्यायला चालू केले. कापलेल्या, खरचटलेल्या ठिकाणी ‘कोकोनट ऑईल’ लावू लागला. ब्रूसचे वजन न्यून झाले, त्याची त्वचा तुकतुकीत दिसायला लागली. जखम पटकन भरायला लागली. ब्रूसच्या आश्चर्याला पारावर उरला नाही.
४. नारळाचे तेल आणि त्याचे पदार्थ यांना वाईट ठरवण्यामागील सोयाबीन उद्योगाचा खटाटोप !
इतके दिवस लोक नारळाला वाईट का म्हणत होते ? याविषयी डॉ. ब्रूस यांनी खोलात जाऊन चौकशी चालू केल्यावर त्यांना आढळून आले की, सोयाबीन ‘इंडस्ट्री’ने (उद्योगाने) जगात पाय रोवण्यासाठी मुद्दाम खोबर्याविरुद्ध अपप्रचार करायला आरंभ केला होता. सगळे जण ‘हार्ट ॲटॅक’ला (हृदयविकाराचा झटका) घाबरतात. ‘खोबरेल तेलात स्निग्धांश अधिक असतात आणि त्याने हृदयविकाराचा झटका येतो; पण सोयाबीनचे पदार्थ खाल्ले, तर हृदयविकार न्यून होतात’, असा खोटा प्रचार चालू केला. घाबरट लोकांनी हे वाचल्यावर नारळाचे पदार्थ खाणे न्यून केले. चाणाक्ष सोयाबीन ‘इंडस्ट्री’ने स्वत:चे घोडे पुढे दामटवले.
५. डॉ. ब्रूस यांनी शरिराला हितकारक खोबरेल तेलाविषयी लिहिलेले पुस्तक
डॉ. ब्रूस यांनी नारळ वापरत असलेल्या देशात जाऊन खोबरेल तेलावर संशोधन केले. खोबर्यातील ‘मिडियम चेन फॅटी ॲसिड्स’ (मध्यम शृंखला स्निग्धाम्ल) शरिराला हितकारक असतात. थायलंड, इंडोनेशिया, फिलिपाइन्स हे देश खोबर्यावर जगतात. त्यांच्यात ‘हार्ट ॲटॅक’चे प्रमाण जगापेक्षा पुष्कळ अल्प आहे. ब्रूस यांनी शोधाअंती ‘खोबर्यामुळे ‘हार्ट अटॅक’ येत नाही’, असे विधान केले. १९९९ या वर्षी त्यांनी ‘कोकोनट ऑईल मिरॅकल’ (खोबर्याच्या तेलाचे चमत्कार) या नावाचे पुस्तक स्वत:च प्रसिद्ध केले. ते वाचून डॉ. मेरी न्यूपोर्ट हिने २००८ या वर्षी ‘अल्झायमर्स’च्या रोग्यांमध्ये खोबर्याच्या तेलाचा उपयोग करून पाहिला. परिणाम बघून तीही चकित झाली. ‘इंटरनेट’मुळे हा अहवाल जगभर पसरला. यू ट्यूबवर आधुनिक वैद्य पौष्टिक आहारासाठी नारळाचे दूध कसे बिनधास्तपणे वापरावे ? याच्या प्रतिदिन नव्या पद्धती देतात.
६. आजीच्या बटव्यातील रामबाण औषध : खोबरेल तेल
माझ्या आजीच्या बटव्यात जगातील सर्व व्याधींवर रामबाण उपाय म्हणून एकच औषध होते ते म्हणजे खोबरेल तेल ! परीक्षा आली की, डोके थंड रहावे; म्हणून ती माझ्या डोक्यावर खोबरेल तेल लावायची. केस काळे रहावेत; म्हणून आंघोळीच्या आधी डोक्याला खोबरेल तेलाने मालीश करायची. त्वचा चरबरीत होऊ नये; म्हणून अंगाला खोबरेल तेल चोळायची. कान दुखला, तर कानात खोबरेल तेलाची कोमट धार सोडायची. सर्दी झाली, डोके मागे करून नाकात गरम खोबरेल तेलाचे थेंब घालायची. ती जेव्हा ९५ व्या वर्षी गेली, तेव्हा तिच्या डोक्यावर सगळे केस होते आणि तेही काळे !
सध्या माझी हॉवर्ड विद्यापिठात असलेली हुशार मुलगी अदिती नियमितपणे खोबरेल तेल वापरते. ती डोक्याला आणि अंगाला तेल लावतेच; पण ब्रूस यांनी सांगितल्याप्रमाणे प्रतिदिन ती ३ चमचे तेल पिते. खोबरेल तेलात जेवण करते. मी खोबरेल तेलावर वाढूनही त्याचा वापर थांबवला; म्हणून मला स्वतःची कीव वाटते. डॉ. ब्रूस यांच्या अथक प्रयत्नांनी अमेरिकेतही खोबरेल तेल पुष्कळ लोकप्रिय होत आहे. ते ‘अँटी एजिंग’ (वाढलेले वय लपवणारे) असल्याचे नवनवे अहवालही प्रतिदिन प्रसिद्ध होत आहेत.
– डॉ. मीना नेरूरकर