कर्जतमधील नूपुर शर्मा प्रकरणाचे तात्काळ अन्वेषण करून आरोपींना शिक्षा करावी ! – नितेश राणे, आमदार, भाजप

कर्जत (नगर) – आक्रमण झालेल्या प्रतीक पवार याला अन्य कारणांनी मारले, हे सर्व खोटे आहे. ‘तू जास्त हिंदु हिंदु करतो. नूपुर शर्माचे ‘स्टेटस’ ठेवतो’, असे आरोपींचे संदेश प्रतीक पवार याच्या भ्रमणभाषमध्ये आहेत, तर मोदींना नावे ठेवणे, नूपुर शर्माला शिव्या घालणे, हिंदूंना लक्ष्य करणे असे पुरावेही आरोपींच्या भ्रमणभाषमध्ये आहेत, असे आमदार नितेश राणे यांनी सांगितले. या प्रकरणी नगर येथे जाऊन आमदार नितेश राणे आणि गोपीचंद पडळकर यांनी प्रतीकची भेट घेतली आहे, तसेच ‘या प्रकरणाचे तात्काळ अन्वेषण करण्याची मागणी करून आरोपींना शिक्षा करावी’, अशी मागणीही त्यांनी केली आहे. या प्रकरणाची चौकशी ‘एन्.आय.ए.’कडे सोपवण्याची मागणीही नितेश राणे यांनी केली होती.

या घटनेच्या संदर्भात केंद्रीय गुप्तचर यंत्रणांच्या पथकाने माहिती घेण्यास प्रारंभ केला असून त्यासाठी कर्जतमधील घटनास्थळी ३ अधिकार्‍यांनी भेट दिली, तसेच आरोपींकडूनही माहितीही घेतली आहे. या गुन्ह्याला भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा प्रकरणाचा संदर्भ असला, तरी दोन्ही गटांतील पूर्व वैमनस्याचीही पोलिसांकडून माहिती घेतली जात आहे.

आमदार नितेश राणे पुढे म्हणाले की, जेव्हा अमरावतीची घटना घडली, तेव्हा ‘एन्.आय.ए.’च्या अन्वेषणात आरोपींचे ‘सिमी जिहादी कनेक्शन’ समोर आले. या घटनेकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष ठेवून आहेत. आम्ही सर्व हिंदुत्वनिष्ठ सरकारचे प्रतिनिधी आहोत.