पुणे – ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमातून देशातील प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचे ध्येय घेण्यात आले आहे. त्यासाठी पुणे विभागातील टपाल खात्याने १ लाख ६८ सहस्र ४०० तिरंगा विक्रीचे ध्येय घेतले असून ते पूर्ण करण्यासाठी पुष्कळ प्रयत्न करावे लागत आहेत. ८ दिवसांमध्ये केवळ ५ सहस्र २८२ नागरिकांनी तिरंगा खरेदीसाठी नोंदणी केली असून त्यांतील ३ सहस्र ३९५ तिरंगा नागरिकांना देण्यात आला आहे. अद्यापही १ लाख ६३ सहस्र तिरंगा झेंडे टपाल खात्याकडे शेष आहेत.
पुणे विभागामध्ये पुणे, सोलापूर, सातारा, नगर हे जिल्हे असून १ ऑगस्टपासून तिरंगा विक्रीस प्रारंभ झाला आहे. टपाल खात्याच्या अधिकृत संकेतस्थळावर झेंड्याची मागणी करू शकतो. मागणीनंतर केवळ २५ रुपयांमध्ये तिरंगा घरपोच केला जात आहे. ‘ज्या दिवशी तिरंगा झेंड्याची मागणी नोंदवली जाते, त्याच दिवशी झेंडा घरपोच केला जात आहे’, असे टपाल खात्याकडून सांगण्यात आले.