‘व्यायामाचे महत्त्व समजल्यावर बहुतेक जण उत्साहात व्यायाम चालू करतात; परंतु हा उत्साह ३ – ४ दिवसांत मावळू लागतो. उत्साहाऐवजी आळस प्रबळ होतो आणि ‘आज असो. उद्या करू’, हा विचार डोके वर काढतो. व्यायामामध्ये सातत्य ठेवण्यासाठी कृतीच्या स्तरावरील एक सोपा उपाय म्हणजे ‘५ मिनिटांचा नियम’ वापरणे. ‘कोणतीही कृती अगदीच न करण्यापेक्षा ५ मिनिटे करूया; म्हणून आरंभ करणे’, म्हणजे ‘५ मिनिटांचा नियम वापरणे’. जेव्हा ‘आज व्यायाम नको करूया’, असा विचार मनात येईल, त्या वेळी ‘५ मिनिटेच व्यायाम करूया’, असे म्हणून व्यायाम चालू करावा. व्यायाम चालू केल्यावर आपोआप उत्साह येतो आणि कधी अर्धा घंटा व्यायाम होतो, ते समजतही नाही. त्यातही आळस पुष्कळ प्रबळ झालाच, तर आपण ५ मिनिटांनंतर थांबू; परंतु अगदी काहीच केले नाही, असे तरी होणार नाही. व्यायामाचा सुपरिणाम दिसू लागल्यावर व्यायामाची गोडी लागेल आणि मग आपोआप व्यायामात सातत्य राहील.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.८.२०२२)