५७ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला फोंडा, गोवा येथील कु. दक्ष सुरेश सोमवंशी (वय ७ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. दक्ष सोमवंशी हा या पिढीतील एक आहे !

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

आषाढ कृष्ण सप्तमी (२०.७.२०२२) या दिवशी फोंडा, गोवा येथील कु. दक्ष सुरेश सोमवंशी याचा ७ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्याच्या कुटुंबियांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये आणि आलेली अनुभूती पुढे दिली आहे.

कु. दक्ष सोमवंशी

१. वय १ ते ३ वर्षे

१ अ. ३ वर्षांचा झाल्यावरही बोलता न येणे आणि प.पू. भक्तराज महाराज अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना केल्यावर हळूहळू बोलू लागणे : ‘दक्ष ३ वर्षांचा झाला, तरी त्याला बोलता येत नव्हते. तेव्हा आम्ही कुटुंबियांनी प.पू. भक्तराज महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना केली. त्यानंतर तो हळूहळू बोलू लागला. तो बोलायला लागल्यावर त्याने प्रथम ‘ॐ’ आणि ‘बाबा’ हे शब्द उच्चारले.’ – कु. प्रीती बागले (आते बहीण), कु. माधवी बागले (आते बहीण), श्री. हितीकेश बागले (आते भाऊ), सौ. प्रमिला बागले (आत्या) आणि श्री. चंद्रकांत बागले (मामा)

२. वय ३ ते ६ वर्षे

२ अ. सात्त्विकतेची ओढ

१. ‘त्याला प.पू. बाबांची भजने म्हटल्याविना, तसेच नामस्मरण आणि प्रार्थना केल्याविना झोप लागत नाही.

२. त्याला सात्त्विक आणि असात्त्विक गोष्टी ओळखता येतात. तो सात्त्विक उत्पादने अन् स्वदेशी वस्तू वापरतो.

३. एकदा मी दक्षला खेळायला घेऊन जाणार होते; पण तो म्हणाला, ‘‘मला खेळायला जायचे नाही. आपल्याला देवदर्शनाचे महत्त्व सांगितले आहे. त्यामुळे मी मंदिरातच जाणार आणि देवदर्शन घेणार.’’

– कु. माधवी बागले

४. ‘तो सर्वांना प्रार्थना आणि नामजप करण्याची आठवण करून देतो.’ – सौ. प्रमिला बागले

२ आ. सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता : ‘आमच्या आजी (वडिलांची आई) (कै.) लक्ष्मी सोमवंशी हिच्या शेवटच्या आजारपणात तिला एका रुग्णालयातून दुसर्‍या रुग्णालयात भरती केले. आम्ही रुग्णालयातून घरी आल्यावर दक्ष माझ्याजवळ येऊन म्हणाला, ‘‘ताई, आपली आजी परात्पर गुरु डॉक्टरांकडे गेली. ती रुग्णालयात नाही.’’ त्यानंतर अर्ध्या घंट्याने माझ्या भावाकडून (श्री. हितीकेश बागले यांच्याकडून) आम्हाला आजी देवाघरी गेल्याचे कळाले. तेव्हा ‘दक्षला सूक्ष्मातील कळते’, हे माझ्या लक्षात आले.’ – कु. माधवी बागले

२ इ. परात्पर गुरु डॉक्टरांप्रतीचा भाव 

१. ‘घरात काही नवीन वस्तू आणली की, ‘ही वस्तू परात्पर गुरु डॉक्टरांनीच आणली आहे’, असे त्याला वाटते. त्यामुळे तो गुरुदेवांच्या छायाचित्रासमोर उभा राहून ‘हे तुमच्यासाठीच आहे’, असे म्हणतो.’ – श्री. हितीकेश बागले

२. ‘दक्ष रात्री झोपतांना प.पू. बाबा आणि परात्पर गुरु डॉक्टर यांना सूक्ष्मातून ‘दिवसभरात त्याने काय काय केले ?’, हे सांगतो.’ – कु. प्रीती बागले

३. ‘त्याच्याकडून चूक झाल्यावर तो सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉक्टरांना ‘मी चुकलो’, असे सांगतो.’ – सौ. प्रमिला बागले

३. अनुभूती

‘दक्ष २ वर्षांचा असतांना आम्ही तिरुपति येथे देवदर्शनाला गेलो होतो. तेव्हा तेथे काही वयस्कर स्त्री-पुरुष डोळ्यांत अश्रू आणून दक्षच्या पाया पडत होते आणि आम्हाला सांगत होते, ‘‘हा गोविंदा आहे.’’ मला वाटले, ‘ते सर्वच लहान मुलांच्या पाया पडत असतील’; पण तेथे अनेक लहान मुले असूनही ते केवळ दक्षच्याच पाया पडत होते.

४. स्वभावदोष

हट्टीपणा, अभ्यास करण्याचा कंटाळा करणे आणि जेवणामध्ये आवड-नावड असणे.’

– कु. माधवी बागले, पनवेल (१०.८.२०२१)

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक