स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत सोलापूर जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन !

डावीकडून पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त राजेंद्र माने, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी

सोलापूर, ८ ऑगस्ट (वार्ता.) – भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अंतर्गत जिल्ह्यात १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर तिरंगा’, तर ९ ते १७ ऑगस्ट या कालावधीत ‘स्वराज्य महोत्सव’ हा उपक्रम राबवला जात आहे. यामध्ये सर्व शासकीय विभागांचा सक्रीय सहभाग असणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अंतर्गत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी सोलापूर शहर पोलीस आयुक्त राजेंद्र माने, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार उपस्थित होते.

या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी म्हणाले की, १० ते १५ ऑगस्ट या कालावधीत जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणारी सर्व शासकीय कार्यालये, शाळा यांची स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे, तसेच प्रत्येक ग्रामपंचायत परिसरात किमान ५०० झाडे लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शेतकर्‍यांनी ‘सेंद्रीय शेती’स प्राधान्य द्यावे यासाठी ‘शेतकरी मेळाव्यां’चे आयोजन, तर ‘भ्रमणभाषच्या अतीवापरामुळे मुलांवर होणारे दुष्परिणाम’ या विषयावर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात येत असून १५ टक्के मुलांना डोळ्यांचे आजार असल्याचे समोर आले आहे.