पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील सरकारकडे प्रांतातील सर्व कारागृहांतील अल्पसंख्यांक समाजातील म्हणजे हिंदु, शीख, ख्रिस्ती या धर्मांतील बंदीवानांना त्यांचे धर्मग्रंथ पाठ केल्यास त्यांच्या शिक्षेमध्ये ३ ते ६ मासांची सूट देण्याचा प्रस्ताव आला आहे. यावर अद्याप निर्णय व्हायचा आहे. जर हा निर्णय झाला, तर या बंदीवानांना धर्मग्रंथ कोण उपलब्ध करून देणार ? हेही त्या वेळेला स्पष्ट होईल. त्यानंतर बंदीवान धर्मग्रंथ पाठ करण्याचा प्रयत्न करतील. यातील हिंदूंसाठी श्रीमद्भगवद्गीता हा धर्मग्रंथ पाठ करण्याचा प्रस्तावात उल्लेख आहे. हा संपूर्ण धर्मग्रंथ संस्कृतमध्ये आहे. तो जर पाठ करायचा असेल, तर संस्कृत उच्चार येणे आवश्यक आहे अथवा त्याचे भाषांतर पाठ करण्याचा पर्याय देणे आवश्यक ठरेल, अन्यथा या बंदीवानांना शिक्षेत सूट मिळवणे अशक्य होऊन बसेल. त्याचप्रमाणे हे हिंदु बंदीवान किती गुन्हेगारी वृत्तीचे आहेत ? याविषयी ठाऊक नाही, त्यामुळे त्यातील किती जण खरेच याचा लाभ घेतील कि आहे ती शिक्षा भोगण्यात धन्यता मानतील ? हेही ठाऊक नाही. एखाद्या गुन्हेगारी वृत्तीच्या व्यक्तीला धर्माविषयी आपुलकी असू शकते, तो धार्मिकही असू शकतो; मात्र ‘तो धर्मग्रंथ पाठ करील किंवा त्यानुसार अनुसरण करील’, अशी शक्यता पूर्णपणे असेल, असे नाही. जर या बंदीवानांनी धर्मग्रंथाचे पाठांतर केले, तर त्यांचे मन आणि बुद्धी यांवर सकारात्मक परिणाम होऊन त्यांच्या व्यक्तीमत्त्वातही पालट होईल. अशा व्यक्तीमधील गुन्हेगारी वृत्ती अल्प होण्यास साहाय्य होऊ शकेल. पाकिस्तान एक इस्लामी देश आहे आणि या देशातील एका प्रांतामध्ये तेथील अल्पसंख्यांकांसाठी धर्मग्रंथांचे पाठांतर करण्याचा निर्णय घेतला जाणे, हे आश्चर्यजनकच म्हणावे लागेल. या देशात अल्पसंख्यांकांचा वंशसंहार होत असतांना, त्यांच्या धार्मिक स्थळांवर आक्रमणे होत असतांना असा प्रस्ताव येत आहे, हे महत्त्वाचे आहे. यातून संबंधित बंदीवानांची स्वत:च्या धर्माविषयीची श्रद्धा वाढू शकते, अभ्यास वाढू शकतो, हेही या सरकारच्या लक्षात असणार, तरीही असा प्रस्ताव आला आहे. असा नियम किंवा प्रस्ताव भारतात बहुसंख्य हिंदू असतांनाही कधी आलेला नाही किंवा कुणी मागणीही केलेली नाही, हे विशेष ! भारतात समजा असा प्रस्ताव आला आणि तो संमतही झाला, तर भारतातील किती हिंदु बंदीवान याचा लाभ घेतील ? हाही एक संशोधनाचा विषय होऊ शकतो. याचे कारण म्हणजे हिंदूंमध्ये अल्प असलेला धर्माभिमान, धर्माविषयीचे असलेले अज्ञान ! भारत धर्मनिरपेक्ष देश असला, तरी मुसलमान आणि ख्रिस्ती यांना त्यांच्या धर्माचे शिक्षण त्यांच्या धार्मिक स्थळांमधून मिळते, तशी व्यवस्थाच आहे; मात्र हिंदूंना धर्माचे शिक्षण मिळण्याची विशेष कोणतीही व्यवस्था नाही किंवा सरकारकडून त्यासाठी काही योजना किंवा अनुदान नाही. हिंदु पालकांनाही ‘आपल्या मुलाने धर्मशिक्षण घ्यावे’, असे वाटत नाही; कारण त्यांना धर्मनिरपेक्षतेच्या आणि पुरोगामित्वाच्या अफूची गोळी देऊन झोपवून टाकण्यात आलेले आहे. त्यांना कितीही जागे करण्याचा प्रयत्न केला, तरी तो अल्प प्रमाणात यशस्वी होत आहे. जर धर्मशिक्षण अनिवार्य केले, तर त्याचा परिणाम संपूर्ण समाजावर होईल. गेल्या अनेक दशकांपासून म्हणजे स्वातंत्र्यापासून देशात प्रत्येकाला सैनिकी शिक्षण घेणे बंधनकारक करण्याची मागणी केली जात आहे, त्याच धर्तीवर देशात हिंदूंना धर्मशिक्षण घेणे अनिवार्य करणे आता आवश्यक झाले आहे. तसे केल्यानेच हिंदु धर्माचे पावित्र्य टिकून राहू शकेल आणि समाजात निर्माण झालेली बुवाबाजी, अंधश्रद्धा, जातपात आदी घातक प्रवृत्ती दूर होण्यास साहाय्य होईल.
अशा मुसलमानांकडून शिका !
भारतात दूरचित्रवाहिन्यांवरून प्रसारित होणार्या हिंदूंच्या पौराणिक, धार्मिक मालिका यांना चांगला प्रतिसाद मिळत असतो, हे ‘रामायण’, ‘महाभारत’, ‘कृष्णा’, ‘जय हनुमान’ आदी मालिकांमधून स्पष्ट झालेले आहे. पूर्वी म्हणजे ९० च्या दशकात ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ दूरदर्शनवरून प्रसारित होत असतांना लोक ते भक्तीभावाने पहात होते. आता असा भक्तीभाव किती हिंदूंमध्ये उरला आहे ? हे ठाऊक नाही; मात्र त्यांना अशा वेळी योग्य दिशा देऊन धर्माचरणाकडे नेण्याची आवश्यकता आहे. याचे दायित्व सरकार घेणार नाही; मात्र हिंदुत्वनिष्ठ संघटना, धार्मिक संस्था, संप्रदाय आदींनी पुढाकार घेऊन अशी व्यवस्था निर्माण करण्याची आवश्यकता आहे. यासाठी सर्वांनी संघटित व्हायला हवे. केरळच्या के.के.एस्.एम्. इस्लामिक अँड आटर््स कॉलेजमधील बसीथ आणि जाबीर या मुसलमानांनी रामायण प्रश्नोत्तर स्पर्धेत विजय मिळवला आहे. यापूर्वीही एका मुसलमान मुलीने श्रीमद्भगवद्गीतेच्या पठणामध्ये पहिले पारितोषिक मिळवले होते. यातून ‘मुसलमानही हिंदूंच्या धर्मग्रंथांचा अभ्यास करतात आणि त्यात यशस्वी होतात, तर हिंदू मात्र मागे रहातात’, असे दिसून येत आहे. बसीथ आणि जाबीर यांनी तर ‘सर्व भारतियांनी रामायण अन् महाभारत वाचले पाहिजे आणि त्यातून शिकले पाहिजे; कारण हीच देशाची संस्कृती, परंपरा अन् इतिहास यांचा भाग आहे, हे आपले दायित्व आहे’, असे म्हटले आहे. ‘असे आवाहन मुसलमानांकडून करण्यात येणे, हे हिंदूंना लज्जास्पद आहे’, असे कुणी म्हटले, तर चुकीचे ठरू नये. या दोघांनी सर्व भारतियांना म्हणजे सर्वच धर्मियांना हे आवाहन केले आहे. त्यातील किती मुसलमान हे स्वीकारतील आणि किती या दोघांचा विरोध करतील, हे पुढे पहायला मिळू शकते. नुकतेच एका मुसलमान गायिकेने भगवान शिवाचे गाणे गायल्याने तिला विरोध होत आहे, यातून हे लक्षात घेतले पाहिजे. ज्या राज्यातील बसीथ आणि जाबीर हे नागरिक आहेत, ते राज्य मुसलमान कट्टरतावादी आणि साम्यवादी विचारसरणी यांसाठी कुप्रसिद्ध आहे. अशात त्यांनी केलेला अभ्यास आणि मिळवलेला विजय अधिक महत्त्वाचा वाटतो. हिंदूंनी त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे.