१. ढेकरा येणे आणि उचकी लागणे, असे त्रास होणे अन् त्यावर अनेक औषधोपचार करूनही त्रास न उणावणे
‘जानेवारी २०२२ च्या आरंभापासून मला ‘सतत ढेकरा येणे आणि तोंडातून जोरात आवाज येणे’, असे त्रास होऊ लागले. माझ्यावर घरगुती उपचार चालू होते. मला ‘ढेकरा येणे, तसेच २५.१.२०२२ या दिवसापासून उचक्या लागणे’, असे त्रास होत होते. मला सतत उचक्या लागायच्या. माझ्यावर वेगवेगळे उपचार केले. मी आयुर्वेदाचे उपचारही घेतले; पण काही परिणाम होत नव्हता. तेव्हा घरातील व्यक्तींनाही माझी काळजी वाटू लागली. ‘काय करावे ?’, ते सुचत नव्हते.
२. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा अकस्मात् भ्रमणभाष येणे
२ अ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर ढेकरा येण्याचा आणि उचकी लागण्याचा त्रास नाहीसा होणे : मला श्री गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांची आठवण येत होती; पण ‘त्यांना किती त्रास द्यायचा ?’, असे मला वाटायचे. २७.१.२०२२ या दिवशी अकस्मात् मला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा भ्रमणभाष आला. त्यांचा आवाज ऐकताच माझे दुखणे अर्धे दूर झाले. त्यांनी माझ्या प्रकृतीची विचारपूस केली. तेव्हा मी त्यांना मला होत असलेल्या उचक्या लागणे आणि ढेकरा येणे, या त्रासांविषयी सांगितले. मी काही विचारण्याआधीच त्या मला म्हणाल्या, ‘‘नामजप पाठवत आहे. तो प्रतिदिन २ घंटे करा.’’ त्यानुसार मी २ दिवस नामजप केल्यानंतर उचकी लागण्याचा त्रास न्यून झाला आणि ढेकरा येणेही न्यून झाले. त्यानंतरही मी जप चालूच ठेवला. मला होत असलेला त्रास १ – २ दिवसांनंतर नाहीसा झाला.
२ आ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी अकस्मात् भ्रमणभाष करून विचारपूस केल्यावर डोळ्यांतून आनंदाश्रू येऊन भावजागृती होणे : ‘भगवंताला, श्री गुरूंना किती काळजी असते ! त्यांचे सर्व साधकांकडे सूक्ष्मातून लक्ष असते’, याची मी प्रत्यक्ष अनुभूती घेतली. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी मला ‘अकस्मात् तुमची आठवण आली; म्हणून भ्रमणभाष केला. कसे आहात ?’, असे विचारल्याक्षणी माझ्या डोळ्यांतून आनंदाश्रू आले. माझी भावजागृती झाली. ‘साधक कुठेही असले, तरीही गुरूंचे पूर्ण लक्ष साधकांकडे असतेच’, याची मी प्रत्यक्ष अनुभूती घेतली.
२ इ. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्यात एकच तत्त्व आहे’, याची मी अनुभूती घेतली.’
– श्री. राजाभाऊ सप्तर्षि (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ८८ वर्षे), नागपूर (१९.२.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |