परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७९ व्या जन्मोत्सवाच्या दिवशी जाणवलेली सूत्रे आणि ८० व्या जन्मोत्सवानिमित्त देवाने सुचवलेले विचार

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘सौ. मधुवंती पिंगळे यांनी या लेखात ‘गुरुदेवांचा जन्मोत्सव प्रतिदिन कसा अनुभवायचा ?’, याविषयी त्यांनी केलेले प्रयत्न आणि  अनुभवलेली भावावस्था लिहिली आहे. यातून साधकांना ‘गुरुदेवांना हृदयात कसे अनुभवायचे ?’, हे शिकता येईल. सौ. मधुवंती पिंगळे यांच्या या लेखाचे कौतुक करावे तेवढे थोडे ! त्याबद्दल त्यांचे अभिनंदन ! ’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२१.७.२०२२)  

१.   ७९ व्या जन्मोत्सवाच्या दिवशी जाणवलेली सूत्रे

१ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी ‘हृदयस्थ गुरुदेवांचा जन्मोत्सव प्रतिदिन होत असतांना मी केवळ एकच दिवसाच्या जन्मोत्सवाचा विचार का करत आहे ?’, असा विचार मनात येणे

सौ. मधुवंती पिंगळे

‘प.पू. गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) जन्मोत्सवाच्या दिवशी माझे मन पुष्कळ आनंदी होते. त्या वेळी माझ्या मनात पुढील विचार आले, ‘मला केवळ आजचाच दिवस प.पू. गुरुदेवांचा जन्मोत्सव आहे’, असे का वाटत आहे ? मी गुरुदेवांच्या केवळ स्थुलातील जन्मोत्सवाचा विचार करत आहे. प.पू. गुरुदेव माझ्या हृदयात आहेत आणि हृदयस्थ गुरुदेवांचा जन्मोत्सव प्रतिदिनच असतो; कारण प.पू. गुरुदेव प्रतिदिन माझे प्रारब्ध आणि संचित अल्प करतात. माझे स्वभावदोष आणि अहं अल्प करतात अन् माझ्यामध्ये गुणांची वृद्धी करून हृदयातील गुरुदेवांचे स्थान अढळ करतात. मला याची जाणीव नसल्याने हृदयस्थ गुरुदेवांच्या जन्मोत्सवाचा आनंद मी प्रतिदिन अनुभवू शकत नाही आणि मला कृतज्ञताभावामध्ये रहाता येत नाही.’ गुरुदेवांनीच माझ्या मनात हे सर्व विचार घातले आणि त्यांच्या जन्मोत्सवाचा आनंद कसा घ्यायचा ? ते मला शिकवले.

१ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी नवीन कपडे घालण्यासमवेत आत्मस्वरूपावरील आवरण नष्ट करून त्यांच्यामध्ये विलीन होण्याचा विचार गुरुदेवांनी देणे

मी गुरुदेवांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी नवीन कपडे घातले. हे कपडे घालत असतांना गुरुदेवांनी विचार दिला, ‘गुरुदेवांचा जन्मोत्सव असल्याने केवळ मी नवीन कपडे माझ्या नश्वर देहाला घालून साजरा करण्याचा विचार करत आहे आणि त्यामध्ये आनंद मानत आहे. हे सर्व मला करायचेच आहे; पण माझ्या आत्मस्वरूपावरील आवरण नष्ट करून गुरुदेवांमध्ये विलीन व्हायचे आहे.’

२.   ८० व्या जन्मोत्सवानिमित्त देवाने सुचवलेले विचार

२ अ. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी गुरुदेवांचा जन्म साधिकेच्या हृदयात झाला असून तो कसा अनुभवायचा ?’, त्याविषयी गुरुदेवांनी सुचवणे

या वर्षी प.पू. गुरुदेवांचा (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा) जन्मोत्सव जवळ आला आहे. प.पू. गुरुदेवांचा जन्मोत्सव माझ्या हृदयमंदिरात साजरा करायचा आहे. भावसत्संगामध्ये ‘प.पू. गुरुदेवांचा जन्म आपल्या हृदयात झाला आहे, असे अनुभवायचे आहे’, असे प्रयत्न सांगितले होते. गुरुदेव म्हणजे चैतन्याचा स्रोत. या चैतन्याच्या आधारेच सर्व प्रयत्न होतात; पण मी स्वकर्तृत्वामुळे ते अनुभवू शकत नाही. ‘हे सर्व कसे अनुभवायचे ?’,  याविषयी विचार करत असतांना गुरुदेवांनी मला पुढील विचार दिले.

१. ईश्वराकडे घेऊन जाणारा एखादा विचार, म्हणजे हृदयात गुरुदेवांचा जन्म !

२. माझ्यात गुणवृद्धी होण्यासाठी केलेला प्रयत्न, म्हणजे हृदयात गुरुदेवांचा जन्म !

३. एखादा संघर्षाचा प्रसंग निर्माण झाल्यावर त्यावर केलेली मात, म्हणजे हृदयात गुरुदेवांचा जन्म !

४. दिवसभरामध्ये शिकण्यातील आनंद घेणे, म्हणजे हृदयात गुरुदेवांचा जन्म !

५. सेवा करतांना सुचलेली एखादी नवीन संकल्पना, म्हणजे हृदयात गुरुदेवांचा जन्म !

६. भावजागृतीसाठी केलेल्या प्रयत्नांतून अनुभवलेले गुरुदेवांचे अस्तित्व, म्हणजे हृदयात गुरुदेवांचा जन्म !

७. ‘मी गुरुदेवांचा अंश आहे आणि गुरुदेवच हा देह, मन आणि बुद्धी यांमध्ये कार्यरत आहेत’, ते अनुभवणे, म्हणजे हृदयात गुरुदेवांचा जन्म !

‘वरीलप्रमाणे भाव ठेवल्यास मी दिवसभरामध्ये अनेक वेळा गुरुदेवांचा जन्म माझ्या हृदयामध्ये होत आहे’, असे अनुभवू शकते. त्यातूनच गुरुदेव मला (गुरुदेवांच्या अंशाला) त्यांच्यामध्ये विलीन करून घेणार आहेत. या विचाराने माझे मन आनंदी झाले आणि तसे प्रयत्न गुरुदेवांच्या कृपेने चालू झाले. हे सर्व विचार मला सुचवल्याबद्दल मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती चारुदत्त पिंगळे, मंगळुरू, कर्नाटक. (१५.५.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक